Samagra Shiksha Abhiyan: आजपासून राज्यभरातील 3 हजारावर कर्मचारी संपावर…

समग्र शिक्षा अभियानाचे काम बंद आंदोलन
अमरावती : विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी काम करणारे तसेच शिक्षण विभागाच्या संपूर्ण डोलारा आपल्या खांद्यावर सांभाळणारे व मागील १८ ते २५ वर्षांपासून तुटपुंज्या मानधनावर सेवा देणाऱ्या समग्र शिक्षा अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपली सेवेत कायम करण्याच्या प्रमुख मागणीसाठी आता जोर पकडला असून आज ४ मासून पासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत काम बंद आंदोलन आणि आमरण उपोषणाला त्यांनी सुरवात केली आहे.
आझाद मैदान येथे उपोषणाला सुरवात
शासनाने अनेक विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम केले असताना,समग्र शिक्षा अभियानातील अर्धे कर्मचारी नुकतेच कायम केले आहेत, असे असतांना याच विभागातील अर्ध्या कर्मचाऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष करण्यात येत असल्याने राज्यभरात तीव्र नाराजी आहे. आतापर्यंत आलेल्या सर्व शासनाकडे संघटनेने कायमची मागणी रेटली आहे. परंतु त्या बदल्यात फक्त आश्वासन मिळाली असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले, तर प्रत्यक्षात निर्णय काहीच झाले नाही! वारंवार आंदोलने, निवेदने आणि मागणीनंतरही शासनाने फक्त अभ्यास समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला.
मात्र, सहा महिने उलटूनही या समितीची एकही बैठक न झाल्याने कर्मचाऱ्यांच्या संयमाचा बांध तुटला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील 3 हजारांवर कर्मचारी मुंबईकडे रवाना झाले आहेत, कर्मचाऱ्यांनी आपल्या आयुष्याची अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात योगदान देऊनही त्यांना अत्यल्प वेतनावर काम करावे लागत आहे. अनेक कर्मचाऱ्यांचे आकस्मिक निधन झाले, मात्र त्यांच्या कुटुंबियांना कोणतीही मदत मिळालेली नाही. आता या कर्मचाऱ्यांनी संघर्षाचा मार्ग स्विकारला असून, शासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
शासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या शिक्षण विभागात आर टी इ प्रवेश प्रक्रिया, विविध शिक्षक प्रशिक्षण, शालांत परीक्षा, मार्च असल्याने संयोजनाची कामे असे महत्वाचे कामे सुरू आहे. त्यामुळे हे आंदोलन लांबल्यास शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम करू शकते, नुकतेच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून शासन काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण राज्यभरातील शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे लक्ष आहे.
शासनाकडे हट्ट आंदोलन
नागपूर हिवाळी अधिवेशन दरम्यान आम्ही 3 दिवशीय लाक्षणिक उपोषण करून अधिवेशनावर भव्य मोर्चा (Kam Bandh Andolan) काढला होता, त्यावेळी निवेदन स्वीकारतांना आम्हाला मुंबईमध्ये बैठक लावण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. परंतु 3 महिने उलटूनही शासनाने आमच्या मागणीला गांभीर्याने न घेतल्याने आम्हाला पुन्हा हट्ट आंदोलनाचा मार्ग घ्यावा, लागत असल्याचे मत समग्र शिक्षा संघर्ष समितीचे राज्य सचिव विवेक राऊत यांनी व्यक्त केले.
अमरावती वरून निघाले कर्मचारी
मागील शासनाच्या काळात झालेल्या कॅबिनेट बैठकीत याच विभागातील अर्धे कर्मचारी कायम करण्याचा निर्णय त्यावेळीच्या शासनाने घेतला आहे. राहिलेले अर्धे कर्मचाऱ्यांना ही शासन सेवेत कायम करून समान न्याय शासनाने करावा, अशी मागणी या कर्मचाऱ्यांची आहे. त्यासाठी अमरावती जिल्ह्यातून अनेक करार कर्मचारी मुंबई करीता निघाले आहेत.