माहेश्वरी समाज महाराष्ट्राच्या मातीशी एकरूप – सौ. लहामटे.

माहेश्वरी समाज महाराष्ट्राच्या मातीशी एकरूप – सौ. लहामटे (सोबत – फोटो) अकोले (प्रतिनिधी) माहेश्वरी समाज समाजाच्या चालीरिती नुसार सर्व कार्यक्रम उत्कृष्ट रित्या तर साजरे करतातच याशिवाय महाराष्ट्राच्या सर्व कार्यक्रमात देखील माहेश्वरी समाजाचे बंधु-भगिनी तन-मन-धनाने सक्रीय सहभागी होतात, हि अभिमानाची बाब आहे. एकुणच माहेश्वरी समाज हा महाराष्ट्राच्या मातीशी एकरूप झालेला समाज असल्याचे गौरवोद्गार आमदार डॉ. किरणजी लहामटे यांच्या सुविद्य पत्नी सौ. पुष्पाजी लहामटे यांनी व्यक्त केले. माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने सुरू असलेल्या गणगौर उत्सव 2025 चा समारोप मिरवणुकीचा शुभारंभ आज सौ.लहामटे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. तर माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने अध्यक्षा सौ.प्रियंका बुब व पदाधिकार्यांनी सौ.लहामटे यांना शाल व पुष्पगुच्छ देवुन सन्मानित केले. त्यावेळी सौ.लहामटे पत्रकारांशी बोलत होत्या. फाल्गुन सप्तमी पासुन सुरू होणार्या या उत्सवाची सांगता चैत्र तृतीया ला होते. उन्हाची दाहकता कमी व्हावी म्हणून माहेश्वरी समाजाच्या वतीने फाल्गुन सप्तमीला म्हणजेच शिळसप्तमी ला या उत्सवाची सुरूवात होते. यासाठी आदल्या दिवशीच सर्व स्वयंपाक करून ठेवला जातो. शिळसप्तमीच्या दिवशी कुंभारवाड्यामध्ये असलेल्या शितला मातेचे पुजन केल्यानंतर अन्नग्रहण केले जाते. यादिवशी गरम अन्न घरात शिजविले जात नाही व खाल्ले देखील जात नाही. आणि या दिवसापासुनच माहेश्वरी परिवारातील महिलांच्या आनंदाला उधाण येते. शिळसप्तमी पासुन इसरजी (भगवान महेश) व गौराई (पार्वती) यांची दररोज शहराच्या मुख्य रस्त्यावरून सवाद्य मिरवणुक काढली जाते. या दरम्यान भगवान महेश कडे विवाहीत महिला आपल्या सौभाग्याच्या रक्षणासाठी तर कुमारिका इच्छित जीवनसाथी मिळावा यासाठी हे व्रत करतात. त्याचा समारोप आज झाला. या समारोप मिरवणुकीत प्रत्येक माहेश्वरी परिवाराच्या घरासमोर इसरजी-गौराईचे पुजन करून आशिर्वाद मागितले जातात. तर ज्याप्रमाणे कन्या विवाहानंतर सासरी जाते, त्याचप्रमाणे आज समारोपानंतर गौराईला घेऊन इसरजी जातात, त्यामुळे महिलांसाठी हा भावनिक क्षण असतो. समारोप मिरवणुकीत माहेश्वरी व जैन महिला मंडळाच्या सर्व सदस्या सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.प्रियंका बुब, उपाध्यक्षा सौ.जयश्री मुंदडा, सेक्रेटरी सौ.तृप्ती सारडा, सह-सेक्रेटरी सौ.प्रेरणा वर्मा, कोषाध्यक्षा सौ.ज्योती सारडा, प्रसिद्धी प्रमुख सौ.ज्योती जाजू आदिंनी विशेष परिश्रम घेतले.