Lekhniban Andolan: जिल्हाधिकाऱ्यांना दिले पत्रकारांनी पेन: लेखणीबंद आंदोलन

सरकारी मीडिया मॉनिटरिंग खासगी संस्थेकडे देण्याचा निर्णय मागे घ्या: नयन मोंढे
अमरावती : महाराष्ट्र सरकारने वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे आणि डिजिटल माध्यमांवरील बातम्यांचे संकलन व विश्लेषण करण्याचे काम खासगी संस्थेला देण्याचा निर्णय घेतला आहे.हा निर्णय पत्रकारितेच्या मूलभूत तत्त्वांना आणि लोकशाही मूल्यांना बाधा आणणारा असून, माध्यम स्वातंत्र्यावर गंभीर आघात करणारा आहे. हा निर्णय मागे घेण्यासाठी बुधवार( ता.१२) रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पत्रकारांनी पेन देऊन राज्यव्यापी आंदोलनांतर्गत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ विदर्भाध्यक्ष नयन मोंढे यांच्या नेतृत्वात लेखणी बंद आंदोलन केले.
पत्रकारितेचा मुख्य हेतू जनतेपर्यंत सत्य व वस्तुनिष्ठ माहिती पोहोचवणे हा आहे. मात्र, सरकारकडून या कामासाठी खासगी संस्था नेमण्याचा निर्णय घेतल्याने बातम्यांवर अप्रत्यक्ष सेन्सॉरशिप लादली जाण्याचा धोका आहे. हा निर्णय सरकारविरोधी मतप्रवाह दडपण्याचा आणि प्रसारमाध्यमांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते. देशाच्या लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी आणि पत्रकारितेच्या स्वतंत्र भूमिकेचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई निर्णयाला तीव्र विरोध करीत असल्याचे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विदर्भाध्यक्ष नयन मोंढे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.
सरकारने पारदर्शकता न ठेवता खासगी संस्थेला हे काम सोपवणे म्हणजे माध्यमांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रयत्न आहे. सरकार कडून लादली गेलेली ही अघोषित आणीबाणी त्वरित मागे घेण्यात यावी याकरिता बुधवार १२ मार्च रोजी महाराष्ट्राचे संवेदशील आणि अभिव्यक्ति स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती दिवशी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई तर्फे राज्यव्यापी आंदोलनांतर्गत अमरावती जिल्ह्यात लेखणीबंद आंदोलन व निदर्शने आंदोलन करण्यात आले. ही बाब पुरोगामी महाराष्ट्रात घडू नये, यासाठी आमच्या मागण्यांचा गंभीर्यपूर्वक विचार करून राज्य सरकारने खाजगी संस्थेमार्फत मीडिया मॉनिटरिंग करण्याचा घेतलेला निर्णय त्वरित मागे घ्यावा. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठविण्यात आले.
या आंदोलनात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई विदर्भ प्रदेशाध्यक्ष नयन मोंढे, दैनिक मंगल प्रहरचे मुख्य संपादक सुधीर गणवीर उज्वल भालेकर सागर तायडे मीनाक्षी कोल्हे,अर्चना रक्षे, अनिरुद्ध उगले, संजय तायडे, विकास धदर, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड, डिजिटल मिडिया समितीचे जिल्हाध्यक्ष सागर डोंगरे,सचिव शुभम मेश्राम, उज्वल भालेकर, स्वप्निल सवाळे, अनिरुद्ध उगले, सागर तायडे, गजानन खोपे, राजेंद्र ठाकरे, संजय तायडे, विक्रांत ढोके,नकुल नाईक, मनीष गुडधे यांच्यासह विविध वृत्तपत्र वृत्तवाहिनीचे पत्रकार आंदोलनात सहभागी झाले होते.