Cylinder Explosion: लघुसिंचन कार्यालयासमोर सिलिंडरचा स्फोट
लघुसिंचन विभागाची कोतवाली पोलिस स्टेशनला तक्रार

अकोला : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारातील लघुसिंचन कार्यालयाच्या भिंतीलगत एका चहा विक्रेत्याने ठेवलेल्या साहित्याला भीषण आग लागल्याची घटना ५ मार्च रोजी मध्यरात्री घडली. यामध्ये सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे चहा विक्रेत्याचे सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. याप्रकरणी लघुसिंचन विभागाच्या अधिकार्यांनी सिटी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारातील लघुसिंचन कार्यालयासमोर काही लघू व्यावसायिक हातगाडीवर चहा, उसाच्या रसाची विक्री करतात. रात्री व्यवसाय आटोपल्यानंतर हातगाडी व त्यावरील साहित्य घरी घेऊन जाणे अपेक्षित असताना एका व्यावसायिकाने त्याचे साहित्य बांधकाम विभागाच्या आवारातील एका कडेला ठेवले होते. यामध्ये सिलिंडरसह इतर साहित्याचा समावेश होता.
५ मार्च रोजी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास हातगाडीवर ठेवलेल्या साहित्याला अचानक आग लागली. आगीमुळे सिलिंडरने पेट घेतला. ही आग विझविण्यासाठी मनपाच्या अग्निशमन विभागाने प्रयत्न केले. दरम्यान, या आवारात रात्री स्मशानशांतता असताना चहा विक्रेत्याच्या साहित्याला आग लागली की लावली, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.