आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षकांची वेतनवाढ रोखली
धारणी पीओंकडून शिस्तभंगाची कार्यवाही

अमरावती : माहिती अधिकाराचे दर्शनी भागात फलक न लावणे आणि गळ्यात ओळखपत्र न बाळगण्याप्रकरणी मेळघाटातील चिखली येथील शासकीय आदिवासी मुलींची निवासी शाळेच्या मुख्याध्यापिकासह दोषी काही शिक्षकांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे. तसेच त्यांच्या सेवापुस्तिकेत या प्रशासकीय कार्यवाहीची नोंद घेण्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहे.
आदिवासी विकास विभागाच्या धारणी येथील एकात्मिक प्रकल्प अधिकारी प्रियवंदा म्हाडदळकर यांनी या कार्यवाहीचे आदेश ८ मार्च २०२५ रोजी केले आहे. नारी रक्षा अत्याचार बचाव कृती समितीच्या अध्यक्ष रुक्साना सैय्यद निसार यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशीअंती ही कार्यवाही करण्यात आली आहे. यात चिखली येथील शासकीय आदिवासी मुलींची निवास शाळेच्या मुख्याध्यापिका वाय. एम. वाकोडे यासह दोषी ईतर शिक्षकांवर ही प्रशासकीय कार्यवाही करण्यात आली आहे. या कार्यवाहीमुळे एकच खळबळ उडाली आहे.
माहिती अधिकाराचा फलक नाही चरूक्साना सैय्यद निसार यांनी अपर आयुक्तांकडे दिलेल्या तक्रारीनुसार चिखली येथील आश्रमशाळेत दर्शनी भागात गत २० वर्षांपासून माहिती अधिकाराचे फलक लावण्यात आले नाही. याप्रकरणी गठीत चौकशी समितीने तपासणी केली असता ही बाब निदर्शनास आली. पीओ प्रियवंदा म्हाडदळकर यांनी मख्याध्यापिकेसह दोषी शिक्षकांची वेतनवाढ रोखली. या शिस्तभंगाच्या कार्यवाहीमुळे अन्य आश्रमशाळा, वसतिगृहाचे अधिकारी-कर्मचारी धास्तावले.