Water supply: रस्त्याच्या खोदकामात वारंवार फुटते पाईपलाईन; पाणीपुरवठ्यावर होतोय परिणाम

कळमनुरी/हिंगोली: शहरात रस्त्याच्या चौपदरीकरण करण्याचे काम सुरू असून या कामाचे खोदकाम करताना रस्त्याच्या खाली असलेली नगरपालिकेची पाणीपुरवठ्याची पाईपलाईन ठिकठिकाणी वेळोवेळी फुटत असल्याने याचा परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर होत असून फुटलेल्या पाईपलाईन मधून प्रत्येक वेळी हजारो लिटर पाणी वाया जात आहे यामुळे एन उन्हाळ्यात शहरवासियांना निर्जळीचा सामना करावा लागत आहे.
दि.६ मार्च रोजी शहरातील नवीन बस स्थानक परिसरात रात्री रस्त्याचे खोदकाम सुरू असताना जलवाहिनी फुटली व याचा परिणाम दि.७ मार्च रोजी सकाळी शहराला पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर नागरिकांना या बाबीचा परिणाम भोगावा लागला फुटलेल्या पाईपलाईन मधून हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले यानंतर ही बाब नगरपालिका प्रशासनाच्या लक्षात येताच शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला.
कळमनुरी शहरातून जाणाऱ्या हिंगोली नांदेड रस्त्याचे चौपदरीकरणाच्या कामासाठी जेसीबीने खोदकाम सुरू असून हे खोदकाम करताना नगरपालिका प्रशासनाचे कोणते अधिकारी वा संबंधित गुत्तेदार उपस्थित न राहता जेसीबी चालक खोदकाम करीत असल्याने अनेक वेळा पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाण्याचा विपर्यास झाला आहे त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा अनेक वेळा विस्कळीत होत आहे तरी नगरपालिका प्रशासनाने या प्रकाराकडे लक्ष देऊन संबंधित गुत्तेदारांना ताकीद देण्यात यावी अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे.
पाईपलाईन जोडण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू
शहरातील नवीन बस स्थानक परिसरात रस्त्याचे खोदकाम करताना दि.६ मार्च रोजी रात्री शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली होती परंतु दि. ७ मार्च रोजी सदरील पाईपलाईन जोडणीचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले असून शहराचा पाणीपुरवठा लवकर सुरळीत करण्यात येईल, अशी माहिती नगरपालिकेचे अभियंता अमोल मोरे यांनी दिली आहे.