अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालय पेक्षा कारागृह बरे..!
तहसील कार्यालयातच सुख-सुविधांचा अभाव असल्याने प्रश्नचिन्ह

प्रतिनिधी श्रीकांत नाथे
अंजनगाव सुर्जी :सध्या उष्णतेच्या लाटांमुळे प्रचंड ऊर्जा आणि आद्रतेला सामोरे जावे लागत आहे. अश्यातच अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयातील आवारात असलेल्या सभागृहात फॅन व कुलर विना जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला. तर या जागतिक ग्राहक दिनाच्या कार्यक्रमाला व्यासपीठ मान्यवर म्हणून तहसीलदार सुद्धा उपस्थित होत्या. अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या पदाधिकारी यांनी तहसील अधिकाऱ्यांना विनंती करून सुद्धा फॅन, कुलर दुरुस्ती करिता कार्यालयात पुरेसा निधी उपलब्ध नाही असे तहासीलचे पुरवठा निरीक्षक आर.एन.रामाघरे यांनी सांगितले. परंतु अश्या प्रचंड ऊर्जा आणि आद्रतेमुळे कार्यक्रम दरम्यान कोणत्याही व्यक्तीचा गुदमरून मृत्यू झाला असता याला सर्वस्वी जबाबदार कोण? असा प्रश्न अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या पदाधिकारी यांनी तहसील आवारात संपन्न झालेल्या जागतिक ग्राहक दिनानिमित्त केला. कारण 24 डिसेंबर 2019 ला घनश्याम हजारे योगशिक्षक यांचा याच तहसील कार्यालयाच्या सभागृहात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यांचे अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्ये मोलाचे योगदान होते. त्यामुळे अखिल भारतीय ग्राहक पंचायत पदाधिकारी हे विसरू शकत नाहीत.
तर जिल्हाधिकारी यांनी आदेश पारित केला असतानाही कार्यालयीन अधिकारी वर्गाने अनुपस्थिती दर्शविल्याने अ.भा.ग्रा. पंचायत ने नाराजी व्यक्त केली. जे कार्यालयीन ग्राहकांच्या तक्रारींचा बोझा वाढतोय त्या तक्रारींचे निवारण करायचे कसे? वर्षातून एकदा जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात येतो आणि त्यामधेही कार्यक्रमाला अधिकाऱ्यांची दांडी का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
यावेळी जागतिक ग्राहक दिनानिमित्त व्यासपीठ मान्यवर म्हणून तहसीलदार पुष्पा सोळंके (दाबेराव) उपस्थित होत्या.अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हा सचिव आनंद दादा संगई यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर इशिता डोणगावकर यांनी सायबर क्राईम विषयी उद्भवत असलेल्या प्रश्नांचे निवारण उपाययोजना उपस्थितांसमोर मांडल्या. अ.भा.ग्रा. पंचायत तालुकाध्यक्ष महेंद्र शिंदीजामेकर व शहराध्यक्ष शरयू महाजन यांनी विविध विषयांवर माहिती उपस्थितांसमोर मांडली.तसेच अ.भा.ग्रा. पंचायत सदस्य संतोष गोलाईत व मीनाक्षीताई खेडकर यावेळी उपस्थित होते.