Sonpeth Crime: सोयाबीनला अधिक भाव देतो म्हणत साडे नऊ लाखांची फसवणूक

परभणीतील सोनपेठ पोलीसात गुन्हा
परभणी : बाजार भावा पेक्षा चढ्या दराने सोयाबीन खरेदी करण्याचे अमीष दाखवत सोयाबीनची खरेदी केली. पिकाच्या मोबदल्यात दिलेला रक्कमेचा धनादेश वटला नाही. पैशांची मागणी केल्यावर आज उद्या देतो, असे म्हणत पैसे न देता ९ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी १७ मार्चला सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनादेशावरील स्वाक्षरी बदल केल्याने धनादेश वटला नाही
गजानन तोंडगे यांनी तक्रार दिली आहे. आरोपींनी संगणमत करत फिर्यादीला त्याचे सोयाबीन बाजार भावा पेक्षा चढ्या भावाने घेतो, असे आमीष दाखवून प्रती क्विंटल पाच हजार रुपये या प्रमाणे ९ लाख ४५ हजार रुपये किंमतीचे १८९ क्विंटल सोयाबीन घेतले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला स्टेट बँकेचा धनादेश दिला. या धनादेशावरील स्वाक्षरी बदल असल्याने धनादेश वटला नाही. त्यानंतर फिर्यादीने आरोपींना पैशांची मागणी केली असता आज -उद्या देतो असे म्हणत पैसे दिले नाही.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर सोनपेठ पोलीसात तक्रार देण्यात आली. शेख एजाज, त्यांचा मुलगा व भागीदार असे एकुण तीघांवर गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोउपनि कांबळे करत आहेत.