पाणीटंचाईच्या योजनांत खारपाणपट्टा बारगळला
दुष्काळदाहात तालुके : भातकुली, दर्यापूर, अंजनगाव सुर्जीसह चांदूरबाजार तालुक्यांचा जिल्ह्याच्या आराखड्यात समावेश नाही

अमरावती : उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाई निवारणार्थ एप्रिल ते जून महिन्यात १० तालुक्यातील ३८१ गावांमध्ये ५५५ उपाययोजना करण्यात येणार आहेत. यावर ८.४४ कोटींचा निधी खर्च होणार आहे. मात्र, या आराखड्यात दर्यापूर, भातकुली, अंजनगाव सुर्जीसह चांदूरबाजार तालुक्यातील गावांचा समावेश करण्यात आलेला नसल्याचे वास्तव आहे.
वास्तविक भातकुली, दर्यापूर व अंजनगाव तालुका हा खारपाणपट्ट्यात समाविष्ट आहे. तालुक्यातील बहुतांश योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे आहेत. दर्यापूर व अंजनगाव तालुक्यात शहानूर प्रकल्पाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र, या तालुक्यातील काही गावांमध्ये पाणीटंचाईचे सावट आहे. अशा परिस्थितीत पुरक उपाययोजना करणे आवश्यक आहे. मात्र, हा तालुका मजीप्राकडे असल्याने जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने हात वर केले आहेत. एकीकडे मजीप्राने उपाययोजना प्रस्तावित केल्या नसल्याने या तालुक्यांचा जिल्ह्याच्या आराखड्यात समावेश करण्यात आलेला नसल्याचे सुतोवाच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने केले आहे. चांदूर बाजार तालुक्यातील बहुतेक योजना मजीप्राकडे असल्याने अन्य तालुक्याची पुनरावृत्ती येथेही झाली. त्यामुळे या तालुक्यातील एकही उपाययोजना समाविष्ट नाही.