महाराष्ट्रशिक्षण

Dabha ZP School: दाभा जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी थेट विधानभवनात!

 

 

अमरावती  : दाभा येथील पीएमश्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी थेट विधानभवन गाठत तेथील विधिमंडळाचे कामकाज समजावून घेतले. यावेळी  विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या अनेक प्रश्नाला संबंधित अधिकाऱ्यांनी समर्पक उत्तरे देऊन विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. शिवाय त्यांचे कौतुक देखील केले. हा अभिनव सहशालेय उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय व प्रेरणादायी ठरला.

सहशालेय उपक्रमांतर्गत जाणून घेतले कामकाज

अमरावती जिल्ह्यातील दाभा येथील पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहली नागपूर येथे काढण्यात आली. या सहलीत इयत्ता ६ वी व ७ वी चे एकूण ५३ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांच्या सोबत मुख्याध्यापिका अरुणा घुगे यांच्यासह सविता देशमुख, संगीता सोळंके व निखिल सवाई हे शिक्षक होते.

Dabha ZP School
पीएमश्री योजनेअंतर्गत  विद्यार्थ्यांची सहल जिल्ह्याबाहेर नेण्याच्या वरिष्ठांच्या सूचना असल्याने गटशिक्षणाधिकारी कल्पना वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक व शिक्षकांनी नागपूर येथे सहलीचे नियोजन करण्यात आले. २७ फेब्रुवारीला सकाळी बसने नागपूरकडे सर्व विद्यार्थी सहलीसाठी रवाना झाले. प्रथम त्यांनी रमण विज्ञान केंद्राची पाहणी केली. त्यांनतर  विधानभवन पाहण्यासाठी गेले. तेथील परिसरात प्रवेश करताच विधानभवनाचा परिसर, गगनभेदी इमारत पाहून विद्यार्थ्यांत उत्सुकता निर्माण झाली होती.

अधिकाऱ्यांनी केले विद्यार्थ्यांचे प्रबोधन व कौतुक

आमदार प्रताप अडसड यांचे शिफारस पत्र व  शैक्षणिक सहल असल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. यावेळी त्यांना विधानभवनाच्या कामकाजाची इत्यंभूत माहिती देण्यासाठी दोन पुरुष व एक महिला अधिकारी यांना देण्यात आले होते. या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना विधानपरिषद व विधानसभा यांच्या इमारतीचा कालखंड सांगून विधिमंडळाच्या रचनेबद्दल माहिती दिली. विधेयक मांडण्याची प्रक्रिया, प्रश्नोत्तराचा तास, विविध समित्यांचे कार्य यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची आसनव्यवस्था, विरोधी पक्षनेता कुठे बसतात ,आमदार महोदय यांची सिनिअरिटीनुसार कशी बैठक व्यवस्था असते.

सभापती महोदय यांचा सभागृहातील प्रवेश कुठून होतो, उपसभापती यांचा सभागृहात प्रवेश कुठून होतो, सभापती यांची उंचीवरील खुर्ची त्याखाली तीन खुर्चीवर कोणते अधिकारी असतात. प्रत्येक आमदार यांच्यासमोर असलेली माईक सिस्टिम कशी असते, त्यांच्या टेबल वरील स्क्रीन, गॅलरीत कोणत्या कंपार्टमेंट मध्ये पत्रकारांची बैठक व्यवस्था असते.  विधानपरिषद व विधानसभा अध्यक्षांचे दालन तसेच विशेष व्यक्ती आल्यास त्यांची बैठक व्यवस्था याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यानंतर या सभागृहाबद्दल तथा कामकाजाबद्दल आणखी काही प्रश्न विचारायचे असल्यास विचारा म्हणून सांगितले, यावेळी विद्यार्थ्यांनी मनात घोंगवणारे काही प्रश्न संबंधित अधिकाऱ्यांना विचारले. त्यांच्या सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन विद्यार्थ्यांचे सदर अधिकाऱ्यांनी प्रबोधन केले व त्यांचे कौतुकदेखील केले.

शिफारस पत्राने मिळाला प्रवेश

धामणगाव रेल्वे मतदार संघाचे आमदार प्रताप अडसड यांनी दाभा येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी विधानभवन पाहणीबाबत शिफारस पत्र दिल्याने विद्यार्थ्यांना  विधानभवनात प्रवेश मिळाला. त्यांच्या सहकार्याचे शाळेतर्फे आभार मानले.

लोकशाहीचे मंदिर पाहण्याचा अत्यानंद झाला

भारत देश हा सर्वात मोठी लोकशाही असलेला देश असून लोकशाही प्रतिनिधित्व करणारे सभागृह व इमारत पाहून सहल सार्थकी झाली,असे वाटले व आदरणीय गट शिक्षणाधिकारी कल्पना वानखेडे मॅडम यांच्या कल्पनेमुळे व विद्यार्थी सहली निमित्याने आम्हा सर्वसाधारण शिक्षकाला लोकशाही मंदिर पाहायला मिळाले याचा खूप आनंद झाला. असे मत शिक्षक निखिल सवाई यांनी व्यक्त केले.

FacebookWhatsappInstagramTelegram
शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.