शासकीय ठेकेदाराने दिली सरपंचांना २० हजारांची लाच
झेडपीकडे दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी प्रलोभन, एसीबीची कारवाई

अमरावती : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात केलेली तक्रार मागे घेण्यासाठी एका शासकीय कंत्राटदाराने तक्रारकर्त्या सरपंचास २० हजार रुपये लाच दिली. त्या कंत्राटदारासह त्याला लाचेची रक्कम देण्यास प्रवृत्त करणाऱ्या अन्य एका शासकीय कंत्राटदारालादेखील अटक करण्यात आली. अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ५ मार्च रोजी सायंकाळी धामणगाव रेल्वे तालुक्यात ही कारवाई यशस्वी केली.
मनीष श्रीखंडे (२९) व सुदेश मेंघाणी (३२, दोघेही रा. वरूड) अशी लाचखोरांची नावे आहेत. त्यांच्याविरूध्द दत्तापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. श्रीखंडेने धामणगाव रेल्वे तालुक्यातील हिंगणगाव ग्रामपंचायत अंतर्गत रस्तानिर्माणाचे काम घेतले होते. १५ दिवसांपूर्वी ते कामदेखील सुरू झाले. मात्र, ते काम नियमानुसार होत नसल्याचा आरोप करत सरपंचांनी त्या विरोधात २७फेब्रुवारी रोजी जि. प. कडे तक्रार केली.
असा झाला सापळा तक्रारदार सरपंचांनी आरोपीने रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे केलेली तक्रार मागे घ्यावी आणि कामकाज पूर्ण झाल्यावर ग्रामपंचायतकडून देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रामध्ये अडचण निर्माण करू नये, याकरिता श्रीखंडे याने तक्रारदार सरपंचांना लाच म्हणून २० हजार रुपये देण्याचे मान्य केले. आरोपी सुदेश मेंघानी याने लाच देण्यासाठी प्रोत्साहित केले. सापळा कार्यवाहीदरम्यान मनिष श्रीखंडे याने सरपंचांना २० हजाव रुपये लाच दिली. आरोपींकडून ५ हजार ६७० रुपये जप्त करण्यात आले. दोन्ही लाचखोरांना दत्तापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
अलिकडचा पहिला रिव्हर्स ट्रॅपस रपंचाने सदसदविवेकबुद्धीला जागत एसीबीकडे तक्रार नोंदविली. त्यामुळे धामणगाव रेल्वे येथे ५ मार्च रोजी एसीबीने यशस्वी केलेला हा अलिकडच्या काळातला पहिला रिव्हर्स ट्रॅप ठरला आहे. असे ट्रॅप खुप अपवादाने होतात, असे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक मारूती जगताप, अपर पोलिस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात पोलिस निरिक्षक केतन मांजरे, संतोष तागड यांच्यासह हवालदार प्रमोद रायपुरे, राजेश मेटकर, वैभव जायले, शैलेश कडू, युवराज राठोड, गोवर्धन नाईक आदींनी केली.