चांदूर बाजार पंचायत समितीची आमसभा विविध मुद्यांवर गाजली
महसूल विभागाचे अधिकारी अनुपस्थित, आमदारांनी दिले कारवाईचे निर्देश

चांदूर बाजार : स्थानिक पंचायत समिती कार्यालयाच्या मैदानात १ मार्च रोजी वार्षिक आमसभेचे आयोजन केले होते. ही आमसभा विविध मुद्द्यांवर गाजली. नागरिकांच्या अनेक समस्यांवर विविध विभागांतील अधिकाऱ्यांना आ. प्रवीण तायडे यांनी चांगलेच धारेवर धरले. या आमसभेत तहसीलदार तसेच महसूल विभागाचे अधिकारी अनुपस्थित असल्याने आमदारांनी वरिष्ठांना फोनद्वारे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश दिले आहेत.
आमसभेच्या अध्यक्षस्थानी आ.प्रवीण तायडे होते. गटविकास अधिकारी नारायणराव अमझरे, गटशिक्षणाधिकारी वकार अहमद, भाजप तालुकाध्यक्ष मुरली माकोडे, बियाणे मंडळाचे अध्यक्ष प्रमोद कोरडे, आनंद अहिर, किरण सिनकर, विलास तायवाडे, रावसाहेब गुलक्षे, नितीन टिंगणे, जयश्री पंडागळे आदी उपस्थित होते.
आमसभेत पाणीटंचाईचा आढावा घेण्यात आला. कुरळपूर्णा येथे पाण्याची टाकी शोभेची वस्तू झाली, तर जवळा येथील टाकीची दुरवस्था झाली आहे. इतर ठिकाणी लिकेज वाढले असल्याचे उपस्थित नागरिकांनी सांगितले. उन्हाळ्यात पाणीटंचाई निवारणासाठी बोअरवेल, तर कुठे हातपंपाची आवश्यकता असल्याचेही उपस्थित सरपंचांनी सांगितले. मजीप्राच्या कामांचा आढावा सादर करताना उपस्थित नागरिकांच्या तक्रारींवर आमदारांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शिरसगाव कसबा येथील सरपंचांनी बंधाऱ्याच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याबाबत आमदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना खुलासा मागितला. ग्रामीण पातळीवरील राजकारणाचे बळी ठरणारे व इतर कोणत्याही कारणाने वंचित असणाऱ्या खऱ्या लाभार्थीचे नावेदेखील घरकुल यादीत समाविष्ट करा. चांदूर बाजार शहरासाठी महावितरण कार्यालय शहरात आणा, अशा सूचना आमदारांनी अधिकाऱ्यांना केल्या.