ताज्या घडामोडीमहत्वाचेमहाराष्ट्र

अवैध सावकारीचा संशय दोन ठिकाणी धाडसत्र

दोन महिन्यांत २२ कारवाया : 'सहकार'च्या पथकाची कारवाई

अमरावती : अवैध सावकारीसंदर्भात प्राप्त तक्रारींच्या आधारे सहकार विभागाच्या दोन पथकांनी चांदूर बाजार शहरात बुधवारी दोन ठिकाणी धाडसत्र राबविले. यामध्ये एका ठिकाणी पथक रिकाम्या हाताने परतले, तर दुसऱ्या कारवाईत स्वाक्षरी असलेले धनादेश जप्त करण्यात आले.

मोर्शी येथील सहायक निबंधक कार्यालयात प्राप्त तक्रारींच्या आधारे जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांनी दोन पथकांची नियुक्ती केली. यामध्ये चांदूर बाजार येथील ईश्वरदास एकनाथराव ठाकरे यांच्या घरी व दुकानात एकाच वेळी धाड टाकण्यात आली. सराफा लाईनमधील किराणा दुकानात एआर राजेश भुयार यांच्या पथकाने धाड टाकली. येथे स्वाक्षरी असलेले दोन धनादेश जप्त करण्यात आले.

पथकात सहकार अधिकारी सुधीर मानकर, स्वीटी गवई,नंदकिशोर दहिकर व पंच ओमप्रकाश बोराळकर, कुलदीप कांडलकर, पोलिस कर्मचारी शाकीर हारून शेख व नीलिमा इंगळे यांचा समावेश होता.

चांदूर बाजारच्या एआर स्वरूपा जुमळे यांच्या पथकाने काकडेपुऱ्यातील घरी धाड टाकली. याठिकाणी कोणतेही आक्षेपार्ह दस्तऐवज पथकाला मिळाले नाहीत. या पथकात अविनाश महल्ले, किशोर भुस्कडे, प्रमोद वन्हेकर, पंच भूषण बोराळे, नकुल काळे, पोलिस कर्मचारी मिलिंद वाटाणे व शालिनी वन्हाडे यांचा समावेश होता.

या दोन्ही प्रकरणांत महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ च्या अधिनियमान्वये पुढील चौकशी सहायक निबंधक राजेश भुयार हे करीत आहेत. सहकार विभागाद्वारा अवैध सावकारीबाबत सातत्याने कारवाया होत आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.