ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘रेल्वे’साठी अचलपुरात ‘रास्ता रोको’, ‘शकुंतला’ रेल्वेचा इतिहास काय?

 

अमरावती : ब्रिटिशकालीन शकुंतला रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करून या मार्गावर रेल्वेसेवा पुन्हा सुरू व्हावी, या मागणीसाठी रविवारी शहीद दिनी अचलपूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शकुंतला रेल्वे बचाव समितीच्या वतीने अमरावती-बऱ्हाणपूर राज्य महामार्गावर अचलपुरातील चांदूर नाका येथे हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ऐतिहासिक शकुंतला रेल्वे ही पूर्ववत सुरू व्हावी तसेच या रेल्वेचे नॅरोगेज वरून ब्रॉडगेज मध्ये रूपांतर व्हावे, ही जुनी मागणी आहे.

शकुंतला नॅरोगेज रेल्वे बंद होऊन तब्बल सात वर्षे झाली. ती पुन्हा सुरू करण्यासाठी अचलपूर, मुर्तिजापूर दरम्यान संघर्ष सुरू आहे. ही रेल्वे ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित झाली, तर हा संपूर्ण परिसर आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या अधिक विकसित होईल. या मागणीसाठी ३४ पेक्षा अधिक आंदोलने करण्यात आली असून, राष्ट्रपती, पंतप्रधान, रेल्वेमंत्री आणि राज्य सरकारकडे वारंवार निवेदने पाठवण्यात आली आहेत. मात्र, अजूनही शासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. शांततेच्या मार्गाने सत्याग्रह करूनही सरकारने दुर्लक्ष केल्याने आता रास्ता रोको आंदोलन केले आहे, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.

चांदूर नाक्यावर आंदोलन सुरु असताना तेथून अचलपूर चे आमदार प्रवीण तायडे यांचे वाहन जात असताना आंदोलकांनी आमदारांची गाडी थांबवून प्रवीण तायडे यांना शकुंतला रेल्वे लवकरात लवकर सुरु व्हावी, यासाठी निवेदन दिले. यावेळी आमदारांनी दिल्लीत जाऊन प्रत्यक्ष रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन तोडगा काढू, असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी रेल्वे बचाव समितीचे सदस्य योगेश खानझोडे, गजानन कोल्हे, डॉ निलेश तारे, कचरूशेठ पटवारी, राजाभाऊ धर्माधिकारी, राजेश अग्रवाल, संजय डोंगरे, दीपा तायडे, दयाराम चंदेल, राजेंद्र पांडे, किरण गवई, एस.बी. बारखडे, विजय गोंडचवर, राजेंद्र जयस्वाल, वसंतराव धोबे, आदी उपस्थित होते.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.