पाच महिन्यांत लाडक्या बहिणींना ५२३ कोटींचा लाभ
गतवर्षी डीपीसी आराखडा होता ४७४ कोटींचा

अमरावती : लाडक्या बहिणींमुळे जिल्ह्याच्या अर्थकारणात पाच महिन्यांत ५२३ कोटी २० हजार २० हजार रुपयांची भर पडली. जिल्ह्यात ७ लाख २० हजार ६०३ लाभार्थीपैकी सध्या ६ लाख ९८ हजार ५३६ महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. २२ हजार ६७ महिला लाभार्थी विविध कारणांमुळे अपात्र ठरल्या. विशेष म्हणजे, जिल्ह्याचे गतवर्षीचे नियोजन हे ४७४ कोटींचे होते. पैकी ३०५ कोटी रुपये डीपीसीतून वितरित करण्यात आले. लाडक्या बहिणींना पाच महिन्यात दिलेली ओवाळणी वार्षिक आराखड्यापेक्षाही अधिक ठरली आहे.
६ लाख ९८ हजार ५३६ महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेत पात्र ठरल्याने जिल्हयाच्या अर्थव्यवस्थेला गती आली आहे. गेल्या पाच महिन्यात या योजनेंतर्गत जिल्ह्यात प्रत्येकी दीड हजार रुपयांप्रमाणे सुमारे ५२३ कोटी ९० लाख २० हजार रुपयांचे अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. ही रक्कम सर्व प्रकारच्या बाजारपेठांत फिरली. काही महिलांनी स्वतःचे व्यवसायही सुरू केल्याने त्यातून होणाऱ्या दैनंदिन उलाढालीमुळे अर्थव्यवस्थेत गेल्या पाच महिन्यांत ५२३ कोटींवर रक्कम वापरात राहिली. जिल्ह्यााची लोकसंख्या २७ लाखांवर आहे. यापैकी १३ लाखांवर महिला आहेत. यापैकी १ ते १८ या वयोगटातील महिलांची संख्या जवळपास चार लाखापर्यंत, तर ६५ वर्षांवरील महिलांची संख्या साधारपणे दोन लाखांवर आहे.
९६.९४टक्के महिला या योजनेचा लाभघेण्यासाठी पात्र ठरल्या आहेत, अशी माहिती संबंधित यंत्रणेने दिली आहे.
लाभार्थी संख्या घटणार?
योजनेच्या निकषानुसार लाभार्थी संख्या घटणार आहे. निराधार योजनेचे लाभार्थी असलेल्या महिला यातून वगळल्या जाणार आहेत. तसेच उत्पन्नाची मर्यादा, नोकरी, एकाच घरातील अनेक व्यक्ती आदी विविध कारणांमुळेही ही संख्या घटणार आहे. यासह काही महिला स्वतःहून योजनेचा लाभ नाकारत आहेत. यामुळे या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या कमी होणार आहे.
*दृष्टिक्षेपात आकडेवारी*
एकूण अर्ज : ७,२०,६०३
पात्र महिला :६,९८,५३६
अपात्र महिला :२२,०६७