मेळघाटात गर्भवती महिलेचा रुग्णवाहिकेतच मृत्यू –
मेळघाटात गर्भवती महिलेचा रुग्णवाहिकेतच मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

अमरावती : प्रसुतीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेत असताना गर्भवती महिलेचा रुग्णवाहिकेतच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना धारणी तालुक्यातील बैरागड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे घडली. या घटनेमुळं मेळघाटातील बाल मृत्यू व माता मृत्यूचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. मधु शंकर जावरकर (रा. कसाईखेड़ा, धारणी) असं मृत्यू झालेल्या गर्भवती महिलेचं नाव आहे. मृत महिला ही धारणी तालुक्यातील बैरागड प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या कसाईखेडा गावातील रहिवासी होती. ती सात महिन्याची गर्भवती होती.
अशी आहे घटना? : गर्भवती महिलेची प्रकृती बिघडल्यानं तिला उपचारासाठी बैरागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णवाहिकेद्वारे नेण्यात येत होतं. परंतु, रुग्णालयात नेत असताना रुग्णवाहिकेतच तिची प्रकृती बिघडल्यानं तिचा मृत्यू झाला. मृत महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं. या ठिकाणी डॉक्टरांनी महिलेचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं.
तीसात महिन्याची गर्भवती : कसाईखेडा येथील 22 वर्षीय महिला सात महिन्याची गर्भवती होती. घटनेच्या वेळी तिच्या पोटात सात महिन्याचं बाळ होतं. उपचारापूर्वीच मातेचा मृत्यू झाल्यामुळं तिच्या गर्भातील सात महिन्याचं बाळ देखील दगावलं. गर्भवती माता व तिच्या सात महिन्याच्या बाळाचा करुण अंत झाल्यानं हळहळ व्यक्त होत आहे.