जिल्ह्यात दररोज १.८० लाख किलो तेल केले जाते फस्त
प्रमाणात तेल वापरावे : अतिवापर ठरू शकतो आरोग्यास धोकादायक

खाद्यतेल हे सर्वांच्याच
आहारातील अविभाज्य घटक आहे. याचा वापर प्रमाणात केल्यास आरोग्यासाठी लाभदायक आहे, पण अतिप्रमाण धोकादायक ठरू शकते, असे तज्ज्ञ सांगतात. एक व्यक्तीला दिवसाला ६६ ग्रॅम तेल लागते. या प्रमाणे जिल्ह्याची ३० लाख लोकसंख्या लक्षात घेता, दरोरोज किमान १.८० लाख तेल लागते. खाण्या-पिण्याच्या बदलत्या सवयींमुळे भारतात खाद्यतेलाचा वापर सातत्याने वाढत आहे. देशातील एक व्यक्ती सध्या सरासरी २० किलो तेल वर्षाला वापरते. तज्ज्ञांच्या मते, ४० वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनी वर्षभरात जास्तीत जास्त ७ किलो तेल वापरले पाहिजे; मात्र भारतातला तेलाचा वापर याच्या दुप्पट आहे. तेलाचा अतिवापर टाळा, असा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. त्याचे पालन करण्याचे भारतीयांसमोर आव्हान आहे.
सर्वाधिक पसंती सोयाबीन तेलाला
सर्वाधिक २ हजार किलो सोयाबीन आणि त्या खालोखाल १ हजार किलो पामतेलाची विक्री होते. सध्या सोयाबीन, पाम, राइस ब्रान, सूर्यफुल तेलाचे दर जवळपास सारखेच आहेत. अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच पामतेलाचे दर सोयाबीन तेलापेक्षा ३ रुपये किलोने जास्त आहेत.
कुटुंबाला महिन्याला किती लागते तेल ?पाच जणांच्या कुटुंबाला जवळपास ६ ते ७ किलो सोयाबीन तेल लागते. याशिवाय तळणासाठी २ किलो शेंगदाणा तेल वेगळे घ्यावे लागते. अर्थात, महिन्याला जवळपास ८ ते ९ किलो तेलाचा उपयोग होतो.
किती तेल खावे?जास्त तेल खाण्याची सवय हृदयरोगापासून लठ्ठपणासारख्या अनेक समस्यांचे कारण आहे. एका व्यक्तीने वर्षभरात ८ किलोहून कमी तेलाचे सेवन करावे. यामुळे प्रकृती सुदृढ राहते..
तेल आरोग्यासाठी घातक तेल सेवनाचे वाढते प्रमाण आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. तेलाच्या अतिसेवनामुळे लठ्ठपणा आणि हृदयाशी संबंधित विविध आजारांना निमंत्रण मिळते. अशुद्ध तेलाचा वापर केल्यास श्वसनाचेही विकार होऊ शकतात.
सोयाबीन, सूर्यफुल तेलाची विक्री जिल्ह्यात लोकसंख्येच्या प्रमाणानुसार, दररोज ९० हजार किलो सर्वप्रकारच्या खाद्यतेलाची विक्री होते. त्यामध्ये जवळपास सर्वात जास्त सोयाबीन तेल (१५० रु. किलो), पाम (१५३ रु. किलो), राइस ब्रान (१५० रु. किलो), सूर्यफुल (१५५ रु. किलो), शेंगदाणा (१६८ रु. किलो) तसेच मोहरी, तीळ, खोबरेल, जवस खाद्यतेलाचा जेवणात वापर केला जातो. विविध तेलांचा त्यात समावेश आहे.
तिखट, तळलेले आणि चमचमीत खाद्यपदार्थ खाण्यात भारतीयांचा हात कोणीही धरू शकत नाही. तेलामुळे अन्नाची चव वाढते. आवड आणि खर्चाचे बजेट लक्षात घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे तेल वापरले जाते. लोकसंख्येनुसार तेलाची विक्री वाढली आहे.
ओमप्रकाश तिवारी, व्यापारी