अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यात अवैध व्यवसाय फोफावले मनसे जिल्हाध्यक्ष राज पाटील यांचे पोलिस अधिक्षकांना निवेदन
राज पाटील यांनी दिला आंदोलनाचा इशारा

परतवाडा दि.२१ प्रतिनिधी अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांवर अंकुश लावून तातडीने कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राज पाटील यांनी पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण यांना निवेदन देऊन मागणी केली. या दोन्ही तालुक्यात शहर आणि ग्रामीण भागात विक्री, बेकायदेशीर वाहतूक, जुगार, सट्टा आणि मटका यासारख्या अवैध व्यवसायांचे प्रमाण वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. परिणामी स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
अचलपूर आणि चांदूर बाजार हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले क्षेत्र असल्याने येथे पर्यटकांची वर्दळ अधिक आहे. मात्र, याच भागात अवैध हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि अन्य व्यवसायांमुळे असुरक्षितता वाढली आहे. अवैध धंद्यांमुळे गुन्हेगारी वाढत असून स्थानिक व्यापारावरही परिणाम होत आहे.
निवेदन देतांना राज पाटील यांनी स्पष्ट केले की, यासंबंधी प्रशासनाने त्वरित कठोर पावले उचलली नाहीत, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढील आंदोलनाचा मार्ग स्वीकारेल. तसेच, गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. निवेदनाची प्रत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार प्रविण तायडे यांना देखील पाठवण्यात आली आहे.