Latur : एकाच दिवशी दिले 25000 घरकुलांचे मार्कआऊट..!

लातूर :- लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना यांनी शुक्रवारी औसा तालुक्यातील आलमला येथे भेट देऊन मोदी आवास योजनेतील घरकुलांची पाहणी केली. यावेळी त्यांनी लाभार्थ्यांचा गृहप्रवेश तसेच काही घरकुलांचे भूमिपूजन केले.
आलमला येथून जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांच्या हस्ते शुभारंभ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या शंभर दिवशीय कार्यक्रमांतर्गत प्रधानमंत्री आवास योजना 2024-25 मधील लातूर जिल्हा अंतर्गत मंजूर झालेल्या 25 हजार पात्र लाभार्थ्यांना एकाच दिवशी मार्काऊट देऊन घरकुल बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. जिल्ह्यातील या शुभारंभाचा प्रमुख कार्यक्रम लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांच्या हस्ते औसा तालुक्यातील आलमला येथे झाला. यावेळी लांडगे नामक लाभार्थ्याला प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल बांधकामासाठी मार्काउट देण्यात आले. याचवेळी औसा तालुक्यात शुक्रवारी 3196 लाभार्थ्यांना मार्काऊट देण्यात आले.
लाभार्थ्यांचे मनोगत घेतले जाणून
या कार्यक्रमास प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर, गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता रवी भावले आदी उपस्थित होते. यावेळी सरपंच विकास वाघमारे, उपसरपंच इरफान मुलानी, ग्रामपंचायत सदस्य शिवकुमार पाटील, मधुकर चित्ते, विरनाथ निलंगेकर, लिंबराज लोणारे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष शिवाजी कुंभार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनी अनेक लाभार्थ्यांची थेट संवाद केला. मंजूर घरकुलाचा हप्ता मिळाला की नाही? घरकुलाचे बांधकाम करण्यात काही अडचणी येत आहेत का? याबाबत त्यांनी लाभार्थ्यांचे मनोगत जाणून घेतले. घरकुलाची कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी सर्व संबंधितांना यावेळी दिल्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी अश्रुबा लांडगे या लाभार्थ्याच्या घरकुलाचे भूमिपूजन केले. तसेच किसन श्रीरंग कुंभार, ज्योतिर्लिंग शिवाजी कुंभार यांच्या घरकुलाची फीत कापून उद्घाटन केले.