रेतीचोराने अंगावर घातला ट्रॅक्टर !

अमरावती : एका रेतीचोराने वनकर्मचाऱ्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घातला. ६ मार्च रोजी रात्री ८ वाजता मोर्शी तालुक्यातील कवठाळ येथे ती घटना घडली. याप्रकरणी मोर्शीचे सहायक वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप बावने (३१) यांच्या तक्रारीवरून शिरखेड पोलिसांनी आरोपी अभिजित राजकुमार वानखडे (३१, रा. कवठाळ) याच्याविरुद्ध सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला. ७ मार्च रोजी त्याबाबत एफआयआर नोंदविण्यात आला.
फिर्यादी बावणे हे अधिनस्थ बिट कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन रात्रपाळीची गस्त करत असताना त्यांना वनखंड क्रमांक ८१९ मौजा कवठाळ येथे अवैधपणे रेती साठवून ठेवल्याची माहिती मिळाली. त्याआधारे ते घटनास्थळी गेले असता तेथे १७ ब्रास रेती दिसून आली. तेथेच एक ट्रॉलीत देखील रेती आढळून आली. त्यामुळे बावने यांनी त्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा घटनास्थळ पंचनामा करण्यास सुरूवात केली. त्याचवेळी ट्रॅक्टर मालक आरोपी हा तिथे आला. हा माझा ट्रॅक्टर आहे, असे म्हणून तुम्ही वनविभागाचे कर्मचारी आहात, तुम्ही माझे काही वाकडे करू शकत नाही. मी तुम्हाला मारून टाकीन, असे म्हणून शिवीगाळ केली. बावने व त्यांच्यासोबत असलेल्या चार वन कर्मचाऱ्यांसोबत धक्काबुक्की केली. तथा वनकर्मचाऱ्यांच्या अंगावर ट्रॅक्टर चढविण्याचा प्रयत्न केला.