विद्युत वाहिनी तुटल्याने लागली आग, शेतातील साहित्य झाले जळून खाकर

अंजनसिंगी : यवतमाळ ते रिद्धपूर राज्य महामार्ग क्रमांक ३०० ला लागून आणि अंजनसिंगीपासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या शेतात वीज वाहिनी तुटल्याने लागलेल्या आगीत शेतातील अंदाजे तीन लाखांचे साहित्य जळून खाक झाले. ७ मार्च रोजी ही घटना घडली.
प्राप्त माहितीनुसार, अंजनसिंगी येथील शेतकरी संजय भीमराव घावट यांच्या शेताच्या धुऱ्याने गावठाण फिडरची ११ केव्ही वीज वाहिनी गेली आहे. ७ मार्चला सायंकाळी ५ वाजताचे सुमारास वीज वाहून नेणारी तार तुटून संजय घावट यांच्या शेतातील शेती साहित्यावर पडली. त्यामुळे त्याठिकाणी मोठा आगीचा डोंब उसळला आणि त्यामध्ये शेतातील खोली मधील साहित्य, बांबू, दोन बेडवरील १० टन गांडूळ खत असे अंदाजे तीन लाख रुपयांचे शेती साहित्य आगीत जळून खाक झाले. संजय घावट यांनी कुन्हा पोलिस ठाणे, अंजनासिंगी येथील तलाठी कार्यालय व कनिष्ठ अभियंता यांच्याकडे तक्रार केली. या आगीच्या प्रकरणाची चौकशी करून आर्थिक मदतीची मागणी घावट यांनी केली.
विज वाहिनी तुटून आग लागल्याची माहिती कळली. मी वरिष्ठांकडे माहिती दिली. त्यानुसारच वरिष्ठांकडून घटनास्थळी तपासणी होईल व त्यानंतर पुढील कार्यवाही होईल.
सचिन घुडे, कनिष्ठ अभियंता, महावितरण कार्यालय, अंजनसिंगी