एसटी महामंडळाला ३३०० कोटींची देणी त्यामुळे कर्मचाऱ्यांना संप, आंदोलने न करण्याचे आवाहन

यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. मागील काही वर्षापासून उत्पन्नाचा आलेख कमालीचा घसरला आहे. कर्मचाऱ्यांची तीन हजार ३०० कोटी रुपयांची देयके रखडली आहेत. अशा परिस्थितीत मोर्चे, आंदोलने, संप करू नका, असे आवाहन महामंडळाने केले आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी सहकार्य करा, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे.
पगारातून कपात करण्यात आलेली भविष्यनिर्वाह निधी, उपदान, बैंक कर्ज आदी प्रकारची रक्कम महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केली नाही. प्रत्येक महिन्याला थकबाकी वाढत जाऊन तीन हजार ३०० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. सरकारकडूनही विविध सवलतींच्या प्रतिपूर्तीची रक्कम पूर्ण दिली जात नाही. उत्पन्न कमी आणि खर्च अधिक अशा परिस्थितीत महामंडळाची आर्थिक परिस्थिती खराब झाली आहे.
पीएफची रक्कम मिळत नाही कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेली रक्कम महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा केलेली नाही. परिणामी ही रक्कम जमा होणारे ट्रस्टही अडचणीत आले आहे. अडचणीच्या काळात कर्मचारी या खात्यातून रक्कम काढतात. ट्रस्टकडेही आर्थिक टंचाई असल्याने कर्मचाऱ्यांना रक्कम मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
९९३ मागितले मिळाले ३५० कोटी सवलतीच्या प्रतिपूर्तीचे सरकारकडे ९९३ कोटी ७६ लाख रुपये थकीत झाले आहे. महामंडळ अडचणीत असल्याने ही पूर्ण रक्कम देण्यात यावी, अशी विनंती सरकारला करण्यात आली. प्रत्यक्षात ३५० कोटी रुपये देऊन बोळवण करण्यात आली.
३८० कोटी दरमहा सवलत मूल्याचे विविध सवलतीच्या प्रतिपूर्तीचे दरमहा ३८० कोटी रुपये महामंडळाला सरकारकडून घेणे लागते. परंतु मागील काही महिन्यांपासून ३०० कोटी रुपये चुकता केले जाते. या रकमेतून कर्मचाऱ्यांचा पगारही होत नाही. अशावेळी महामंडळाला रोख स्वरूपात आलेल्या उत्पन्नातून पगाराच्या रकमेची तूट भरून काढली जाते. मागील दोन महिन्यांपासून मात्र ३५० कोटी रुपये देण्याचे सौजन्य दाखविले जात आहे.
“एसटीचा निधी मागणीच्या पत्राला सरकारकडून केराची टोपली दाखविली जात आहे. परिवहनमंत्र्यांनी या प्रश्नाकडे विशेष लक्ष घालून तोडगा काढला पाहिजे.”
श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस