ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

बांबूच्या कलेतून अनोखी निर्मिती अन् मेळघाटातील अनेकांना रोजगार देणारं ‘ग्राम ज्ञानपीठ’

मेळघाटातील आदिवासी बांधवांना बांबूच्या माध्यमातून नवीन कलागुण शिकवणारं आणि अनेक आदिवासी कुटुंबांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणारं ग्राम ज्ञानपीठ हे अतिशय महत्त्वाचं केंद्र.

 

 

अमरावती : मेळघाटातील आदिवासी बांधवांना बांबूच्या माध्यमातून नवीन कलागुण शिकवणारं आणि अनेक आदिवासी कुटुंबांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणारं कोठा इथलं ग्राम ज्ञानपीठ हे अतिशय महत्त्वाचं केंद्र. हरिसाल ते धारणी मार्गावर असणाऱ्या या ग्राम ज्ञानपीठानं मेळघाटातील आदिवासी बांधवांना आर्थिक बळकट करण्यासह नैसर्गिक संकट काळात बांबूच्या मदतीनं इतरांचं रक्षण करण्याचं बाळ देखील दिलं. आदर्श ग्राम कसं असावं याचं अनोखं डिझाइन म्हणजे मेळघाटातील हे ग्राम ज्ञानपीठ आहे. या ग्राम ज्ञानपीठ संदर्भात ‘ईटीव्ही भारत’ चा हा स्पेशल रिपोर्ट.

 

अशी झाली ग्राम ज्ञानपीठची स्थापना : मूळ नागपूरचे असणारे सुनील देशपांडे हे 1994 साली मेळघाटात सामाजिक कार्याच्या उद्दिष्टांनं आले. 1997 मध्ये त्यांनी लवादा या गावात संपूर्ण बांबू केंद्राची स्थापना केली. मेळघाटातील महिलांना बांबूपासून वस्तू बनविण्याचं प्रशिक्षण या केंद्रात मिळायला लागला. बांबूपासून तयार होणारी राखीचा सृष्टीबंध नावाचा ब्रँड त्यांनी तयार केला. पुढं या केंद्राचा विस्तार हरिसाल ते धारणी मार्गावर असणाऱ्या चित्री गावाजवळ असणाऱ्या कोठा या गावालगत एकूण आठ एकर जागेवर नव्यारूपानं करण्यात आला. कोठा इथलं हे ‘ग्राम ज्ञानपीठ’ म्हणजे बीबीचं एक अनोख विश्व. 20 मे 2021 ला सुनील देशपांडे यांचं निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी निरुपमा देशपांडे या लवादा इथलं संपूर्ण बांबू केंद्रासोबतच ग्राम ज्ञानपीठच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळतात.

 

असं आहे ग्राम ज्ञानपीठचं वैशिष्ट्य : “कोठा इथं दहा वर्षांपूर्वी साकारण्यात आलेल्या ग्राम ज्ञानपीठ इथं प्रार्थना स्थळ, यज्ञ मंडप, गुरुकुल, अतिथी निवास, खुला रंगमंच संपूर्ण परिसर एकाच ठिकाणावरून पाहता येईल असं उंच मचान बांबून बनवण्यात आलंय. पूर्वी ज्या वस्तू घरात वापरल्या जायच्या अशा सर्व जुन्या वस्तूंचं संवर्धन करून त्या वस्तू आज देखील कशा वापरता येतील यासाठी या ग्राम ज्ञानपीठात काम केलं जातं. राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत आजवर 3 हजार 240 जणांना बांबू कलेचं प्रशिक्षण देण्यात आलंय. 250 महिलांना बांबू क्राफ्ट ट्रेनिंग या ठिकाणी नुकतचं देण्यात आलं, पुरुषांना बांबूपासून घर उभारण्याचं प्रशिक्षण या ठिकाणी दिल्या जात,” अशी माहिती संपूर्ण बांबू केंद्र ह्या संस्थेशी गत 22 वर्षांपासून जुळलेले प्रकाश वाजगे यांनी ‘ईटीव्ही भारत’शी बोलताना दिली. “मेळघाटातील एकूण 22 गावांमधील ग्रामस्थ ग्राम ज्ञानपीठाशी जुळले असून त्यांना बांबूपासून विविध कला साहित्य प्रशिक्षण मिळालं. या गावातील महिला बांबूच्या विविध वस्तू तयार करतात आणि त्यांनी तयार केलेल्या वस्तू दर बुधवारी आणि शुक्रवारी लवादा आणि ग्राम ज्ञानपीठ ‌या केंद्रात आणून दिल्या जातात. बांबूच्या या वस्तूंना मुंबई, दिल्ली सारख्या मोठ्या शहरांमध्ये मोठी मागणी आहे. बांबूच्या या वस्तूंमुळं मेळघाटातील अनेक कुटुंबांना चांगला रोजगार मिळाला” अशी माहिती देखील प्रकाश वाजगे यांनी दिली.

 

कच्छ भूकंपग्रस्तांना दिलेत भुंगा : “गुजरातच्या कच्छमध्ये भूकंप आला त्यावेळी 742 भुंगा मेळघाटातील बांबू केंद्राच्या माध्यमातून तयार करून दिले होते. आज देखील यापैकी अनेक भुंगांमध्ये तिथले लोकं राहतात. पूर्णतः बांबूच्या साहाय्यानं तयार करण्यात आलेलं हे घर म्हणजे भुंगा. मेळघाटातील ग्राम ज्ञानपीठ परिसरात एकूण दोन भुंगा आज पाहायला मिळतात. याचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्णतः बांबून तयार करण्यात आलेलं हे छोटसं घर शेणामातीने सारवता येतं. यासह या बांबूच्या घराला रेती सिमेंटनं छपाई देखील करता येते. ग्राम ज्ञानपीठ परिसरात असणाऱ्या या भुंगांमध्ये स्वयंपाकाची व्यवस्था झोपण्याची व्यवस्था आणि शौचालयाची सुविधा देखील उपलब्ध आहे. पर्यटनाच्या दृष्टीनं पर्यटक स्थळांवर असा भुंगा खास पर्यटकांसाठी उभारण्याचं काम देखील आमच्या केंद्राच्या माध्यमातून केलं जातं,” असं प्रकाश वाजगे म्हणाले.

 

टेबल, खुर्च्या, घर सारं काही बांबूचं : “कोठा इथल्या ग्राम ज्ञानपीठ या ठिकाणी टेबल खुर्च्या निवासाची व्यवस्था असणारे छोटेसे घर हे सारं काही बांबून तयार केलेलं दिसतं. आदिवासी बांधव या ठिकाणी बांबू पासून वस्तू बनवण्याचं प्रशिक्षण घेऊन याच परिसरात बांबूच्या त्या वस्तू तयार करतात. विशेष म्हणजे या केंद्रात प्रशिक्षित झालेले अनेक आदिवासी युवक मुंबई, पुणे, हैदराबाद अशा शहरांमध्ये बांबू कलेच्या माध्यमातून हॉटेल, घर, आणि फार्म हाऊसचं‌ काम करता. यातून त्यांना चांगला रोजगार मिळतो.” अशी माहिती प्रकाश वाजगे यांनी सांगितली.

ग्राम ज्ञानपीठ पाहण्याकरिता येतात विद्यार्थी : “मेघटातील कोठा इथं असणारं हे ग्राम ज्ञानपीठ पाहण्याकरिता अमरावती, अकोला, बुलढाणा, नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा अशा विविध ठिकाणांवरून विद्यार्थी येतात. या विद्यार्थ्यांमध्ये समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असते. मेळघाटचा परिसर एक उद्योजक परिसर म्हणून कसा निर्माण होईल, यासाठीचा प्रयत्न ग्राम ज्ञानपीठला भेट दिल्यावर लक्षात येतं,” असं नागपूर इथल्या भैय्याजी पांढरीपांडे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्कचे प्राध्यापक डॉ. विलास गोडे यांनी ‘ईटीव्ही भारत’शी बोलताना सांगितलं. प्रा. डॉ. गोडे यांच्या महाविद्यालयातील समाजकार्य विषयाच्या सहाव्या सत्रातील विद्यार्थ्यांची सहल त्यांनी ग्राम ज्ञानपीठ इथं आणली होती. “सुनील देशपांडे यांनी घेतलेलं समाजसेवेचे व्रत आणि आता त्यांच्या पश्चात निरुपमा देशपांडे यांचे हे समाजसेवेचा कार्य एक आगळवेगळे आदर्श आहे,” असं प्रा. डॉ. विलास गोडे म्हणाले.

सांस्कृतिक कार्यक्रमांसह शिबिरांचं आयोजन : “ग्राम ज्ञानपीठ परिसरात काही दिवसांपूर्वी आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान आणि स्वतंत्र सेनानी बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. या केंद्रात दिवाळीला घुंगरू बाजार भरतो आणि होळीला भगवा महोत्सव साजरा करण्यात येतो. दरवर्षी 22 ते 27 मे दरम्यान बालसंस्कार शिबिर आयोजित केलं जातं. या शिबिरात मेळघाटातील अनेक गावातील बालकं सहभागी होतात. या संस्कार शिबिरात बालकांना आपल्या संस्कृतीची ओळख करून दिली जाते. आपल्या गावची संस्कृती देखील किती महत्त्वाची आहे, हे देखील त्यांना सांगण्यात येतं. 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान सिप्ना शोधयात्रा काढली जाते. या सपना शोध यात्रेत देशभरातील अनेक पर्यटक सहभागी होतात,” अशी माहिती देखील प्रकाश बखगे यांनी दिली.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.