ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

राज्याच्या अर्थसंकल्पातून विदर्भाला काय मिळालं? नक्षलग्रस्त गडचिरोलीला मिळणार ‘ही’ नवीन ओळख – MAHARASHTRA BUDGET 2025

मुंबई – एकेकाळी नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जाणारा गडचिरोली जिल्हा आता ‘स्टील हब’ म्हणून उदयाला येत आहे. दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये गडचिरोली जिल्ह्याकरिता २१ हजार ८२० कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचे सामंजस्य करार करण्यात आले. त्यातून ७ हजार ५०० रोजगार निर्मिती होणे अपेक्षित आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडताना यासंदर्भात सोमवारी माहिती दिली.

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना विविध विकासकामांसाठी करण्यात आलेल्या तरतुदींची माहिती दिली. गडचिरोली जिल्ह्यातील दळणवळणासाठी खनिकर्म महामार्गांचे जाळे विकसित केलं जात आहे. त्याकरिता पहिल्या टप्प्यात सुमारे ५०० कोटी रुपये किमतीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. याश‍िवाय या भागातील संतुलित विकासास प्रोत्साहन मिळावे, यासाठी पॅकेजही देण्यात येणार आहे. त्यासाठी ६,४०० कोटी रुपयांचे अनुदान २०२५-२६ या आर्थिक वर्षात देण्याचा प्रस्ताव आहे.

विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना होणार लाभ- महाराष्ट्र टेक्न‍िकल टेक्स्टाईल मिशनची स्थापना करण्यात येणार आहे. त्याद्वारे राज्याला एक ग्लोबल हब म्हणून विकसित करण्यात येईल. याचा विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होईल. याशिवाय नागपूरमध्ये अर्बनहटदेखील उभारण्यात येणार आहे. त्याद्वारे हातमाग विणकरांना फायदा होणार आहे. याशिवाय देशी गायींचे संगोपन, संवर्धन आणि संशोधनासाठी नागपूर जिल्ह्यातील देवलापार येथील गौ-विज्ञान अनुसंधान केंद्रास सहाय्य केले जाईल, असे अर्थमंत्री पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितलं.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.