माजी मंत्री बच्चू कडू यांची शासनाविरोधात रंगपंचमी

परतवाडा : प्रहारचे संस्थापक व माजी मंत्री बच्चू कडू यांनी नेहमीप्रमाणे शेतकरी, दिव्यांग आणि गरजूंवरील अन्यायाविरोधात आवाज उठवत आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले. राजकीय नेते कुटुंबीयांसह रंगपंचमीचा सण साजरा करत असताना, बच्चू कडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारला जाब विचारण्यासाठी १४ मार्च रोजी रस्ते रंगवत फसव्या आश्वासनावर अनोख्या आंदोलनातून रंगाचे कोरडे ओढत शेतकरीविरोधी नीतीवर संतप्त भावना व्यक्त केल्या जाहीरनाम्यात सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा करणार? की भगवा, हिरवा, निळा या रंगातच राजकारण करणार, असा प्रश्न कडू यांनी उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फसवेगिरीवर टीका करणारे पोस्टर लावले. ‘लाडक्या भावाला लुटले आणि बहिणीला दिले, कापूस, हिरवा, भगवा, निळा, पांढरा झाला, अन् सगळ्या झेंड्याचा कपडा शेतामधून आला.” या पोस्टरमधून शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. मतदारांची फसवणूक घातक असल्याचेही ते यावेळी म्हणाले.