ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पाण्यासाठी कामावर खाडा, हापशांमुळे गावात राडा !

उन्हाळ्यात टंचाई : ग्रामीण भागात सहा हजार हातपंप, ४७ बंद स्थितीत

अमरावती ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये, यासाठी गावागावांत हातपंप सुरू करण्यात आले आहेत. योग्य व्यवस्थापनाअभावी हातपंप बंद पडलेल्या अवस्थेत आहेत. आता उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने बंद हापशांमुळे वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. हंडाभर पाण्यासाठी कामावर जाता येत नसल्याने खाडा पडत आहे. पूर्वी हातपंप बसवण्यासह दुरुस्तीचे काम जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी विभागामार्फत करण्यात येत होते. ६ हजार २५ पैकी ५ हजार ९७८ हातपंप सुरू असून, आजघडीला ४७ हातपंप बंद आहेत. या विभागाकडे सध्या ७ पथके कार्यरत आहेत. विशेष म्हणजे या विभागाकडे स्वतःचे वाहन, दुरुस्तीसाठी लागणारा मजूर वर्ग ग्रामपंचायतीने देणे अपेक्षित होते. मात्र, जिल्ह्यात ग्रामपंचायतींकडे मागील काही वर्षापासून लाखो रुपयांची वसुली थकीत आहे. असे असताना गावखेड्यातील हातपंप बंद असल्यास याबाबतची तक्रार संबंधित ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे केल्यास अशा गावात हातपंप देखभाल दुरुस्ती पथक जाऊन हातपंप दुरुस्तीचे काम करतात.ग्रामपंचायतीच्या तक्रारी ८४१ ग्रामपंचायतींच्या हद्दीत सुमारे ६ हजार २५ हातपंप आहेत. यापैकी आजघडीला ४७ हातपंप बंद आहेत. त्यामुळे हातपंप बंद असल्याच्या तक्रारी संबंधित ग्रामपंचायतीकडून पंचायत समितीकडे केल्या जातात. मात्र, कमी मनुष्यबळाअभावी दुरुस्तीची कामे वेळेवर होत नाही. त्यामुळे बरेचदा प्रतीक्षा करावी लागते.

 

हापशी दुरुस्तीची जबाबदारी कुणाची?

हापशा नादुरुस्त असल्याची ग्रामपंचायतीने तक्रार केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी विभागाकडून प्रत्येक पंचायत समितीस्तरावर देखभाल व दुरुस्ती पथक नियुक्त केले आहे. त्याच्या माध्यमातून हापसा दुरुस्तीची जबाबदारी पार पाडली जाते.

विहिरी आटल्या उन्हाळा सुरू होताच मेळघाटातील तसेच गैरआदिवासी भागातील काही गावांत पिण्याच्या पाण्याचे स्रोत आटतात. परिणामी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावतो. यावर टंचाई आराखड्यातून उपाययोजना केल्या जातात.

दुरुस्तीचा खर्च भरूनही ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात असलेला हापसा बंद पडली तर याबाबत तक्रार ग्रा.पं. कडून पंचायत समितीकडे केली जाते. याकरिता नाममात्र २,५०० रुपये शुल्क भरावे लागते. मात्र, बरेचदा वेळेवर काम होत नाही.

टँकर, हापशांभोवती गराडा उन्हाळ्यात मेळघाटातील काही गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई भासते. यामुळे अशा गावांतील नागरिकांची तहान हापशा किंवा टँकरच्या पाण्यावर भागवली जाते. या पाण्यासाठी गराडा घातला जातो.

ग्रामीण भागात हापशा बंद असल्यास संबंधित ग्रामपंचायतीकडून तक्रार येतात. पंचायत समितीमध्ये नियुक्त केलेल्या देखभाल दुरुस्ती पथकाद्वारे दुरुस्तीची कामे केली जातात.

 – प्रमोद कराळे, उपअभियंता, यांत्रिकी विभाग,

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.