Navegaonbandh Gram Panchayat: त्या ग्रामविकास अधिकार्यावर मेहेरबानी कशाला?

कारवाई होणार तरी कधी : सरपंच हिराबाई पंधरे
नवेगावबांध/गोंदिया : एका विशेष ग्रामसभेमध्ये उपस्थित ग्रामस्थांनी सखोल चर्चा करून काही ठराव घेतले होते. परंतु ग्रामविकास अधिकारी यांनी वारंवार सूचना देऊन सुद्धा ग्रामस्थांनी घेतलेले ठराव प्रोसिडिंग बुक वर लिहिण्यात हेतू पुरस्कृत उशीर करून चुकीचे ठराव लिहिले आहेत. माझ्या सरपंच पदाला अडचणीत आणून, ते मला पदमुक्त करण्याच्या प्रयत्नात आहेत. असा आरोप करीत ,अशी तक्रार नवेगावबांध ग्रामपंचायतच्या सरपंच हिराबाई पंधरे यांनी ग्राम विकास अधिकार्यांच्या विरोधात मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया यांना दि.२२ ऑक्टोबर २०२४ रोजी तक्रार केली होती. या तक्रारीला पाच महिन्याचा कालावधी लोटूनही या तक्रारीची साधी दखल घेतल्या गेली नाही. असा आरोप करून,सदर ग्रामविकास अधिकार्यांवर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी नवेगावबांधच्या सरपंच हिराबाई पंधरे यांनी केली आहे.
पाच महिने लोटूनही तक्रारीची दखल नाही
२६ मे २०२३ रोजी नवेगावबांध ग्रामपंचायतची ग्रामसभेची बोलविण्यात आली होती. कोरम अभावी ही सभा त्यादिवशी रद्द करण्यात आली होती. नंतर दि.३१ मे ला या तहकूब सभेचे आयोजन करण्यात आले होते. ही सभा नियमबाह्य असून या सभेत नियमबाह्य आर्थिक खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. ते अवैध आहे. ती सभा रद्द करून सदर ग्रामविकास अधिकार्यांनी कर्तव्यात कसूर केला अशी तक्रार येथील विजय डोये यांनी खंडविकास अधिकारी अर्जुनी मोरगाव यांना केली होती.
त्यांनी ग्रामविकास अधिकार्यावर ठपका ठेवत कारवाईसाठी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया यांच्याकडे प्रस्तावित केला होता. अर्जदाराचे अर्ज मंजूर करत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया यांनी ३१ मे च्या तहकुब ग्रामसभेतील पारित विषय दिनांक २२ ऑगस्ट २०२३ च्या ग्रामसभेत मागील सभेचे विषय वाचून कायम करण्यात यावे. याअंतर्गत विषय वाचूनच दाखविण्यात आले नाहीत. त्यामुळे सरपंच नवेगावबांध यांनी ग्रामसभेचे पुन्हा आयोजन करावे आणि सदर ग्रामसभेत अर्जदाराने सूचना मांडावी.असा आदेश दिला होता.
२२ ऑगस्ट २०२३ च्या ग्रामसभेच्या नोटीस मध्ये कामकाजाचे विषय अंतर्गत मागील ग्रामसभेचे कार्य वृत्त वाचन कायम करणे हा विषय असताना सुद्धा त्या अंतर्गत त्याचे वाचन करण्यास येथील ग्रामविकास अधिकारी रामटेके यांनी कसूर केला असा ठपका ठेवत त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती. सदरचा आदेश २० ऑगस्ट २०२४ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया यांनी दिला होता. या आदेशाला सात महिन्याचा कालावधी लोटूनही ग्रामविकास अधिकार्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून, शेवटी ग्रामविकास अधिकारी रामटेके यांना कुणाची अभय आहे? अशी चर्चा गावात आहे.
चुकीचा ठराव लिहून पदाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न
या आदेशानुसार सरपंच हिराबाई पंधरे यांनी विशेष सभा दिनांक ३० सप्टेंबर २०२४ ला आयोजित केली होती परंतु कोरम अभावी ती ग्राम सभा सुद्धा तहकूब करण्यात आली होती. या तहकूब सभेचे आयोजन ९ ऑक्टोंबर २०२४ ला करण्यात आले. २२ ऑगस्ट२०२३ च्या ग्रामसभेत विषय वाचून कायम करण्यात यावे. या अंतर्गत विषय वाचूनच दाखविण्यात आले नव्हते. मात्र सभेची मंजुरी आहे असे दाखविण्यात आले व कामकाज रजिस्टर मध्ये नोंद करण्यात आली.
ग्रामसभेने सखोल चर्चा करून नियमबाह्य झालेल्या कामाचे खर्च नामंजूर करून सखोल चौकशीची मागणी करून सभेला उपस्थित ग्रामस्थांनी ठराव मंजूर करून घेतले आहेत. यात त्याचप्रमाणे या सभेत संयुक्त वन व्यवस्थापन समिती शासनाच्या आदेशानुसार २४ सदस्यांची निवड करण्यात यावी, असे नमूद असताना ग्रामसभेमध्ये २६ सदस्यांची निवड करण्यात आली होती जीआर नुसार ही समिती गठीत झाली नाही.
सदर समिती रद्द करून वर समितीच्या संदर्भात विशेष ग्रामसभा बोलावून नव्याने वन समिती गठीत करण्यात यावी. असे ग्रामसभेत एक मताने ठराव घेण्यात आले आहे. त्याची संपूर्ण चित्रफीत देखील उपलब्ध आहे. ९ आक्टोंबर २०२४ रोजी झालेल्या विशेष ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी भाग घेऊन सखोल चर्चा केली. मात्र ग्राम विकास अधिकारी व्ही. ई. रामटेके यांनी ग्रामस्थांनी घेतलेले ठराव प्रोसिडिंग बुकवर लिहिण्यात हेतू पुरस्पर उशीर करून चुकीच्या ठराव लिहून माझ्या सरपंच पदाला अडचणीत आणून, मला पदमुक्त करण्याचा प्रयत्न ते करीत आहेत.
असा आरोप या तक्रारीत सरपंच हिराबाई पंधरे यांनी केली आहे. सदर ग्रामविकास अधिकारी मुद्दामून एका आदिवासी महिला सरपंचाला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेत. कारण २१ ऑक्टोबर २०२४ रोजी ग्रामसेवक यांनी ग्रामसभेच्या प्रोसेडिंग बुकवर जे ग्रामसभेत झालेले ठराव नाहीत ते वादग्रस्त ठराव चुकीचे त्यांनी लिहिले आहे. एकदा ग्रामसभेची पूर्ण व्हिडिओ चित्रफीत बघून घ्या आणि नंतर ठराव लिहा. अशी विनंती करून देखील ग्रामविकास अधिकारी यांनी आपल्याच मन मर्जीने ग्रामसभेचे अध्यक्ष व उपस्थित ग्रामस्थांच्या निर्णयाची अवमाणना केली आहे.