विदर्भ वाशिम Washim : जलतारा योजनेच्या कामाचा शुभारंभ; गाव शिवारात १३०० जलताराचे खड्डे करण्याचा संकल्प

मानोरा :- तालुक्यातील जनुना खुर्द येथे दि. १८ मार्चला जलतारा योजनेच्या कामाचा शुभारंभ उपजिल्हाधिकारी कैलास देवरे यांच्या हस्ते शेतकरी संदीप ठाकरे यांच्या शेतात जलतारा खड्डयाचे भूमिपूजन करून करण्यात आला. व जलतारा मोहीम गावात राबविण्याबाबत सभा घेण्यात आली.
जलतारा योजनेच्या बैठकीला शेतकऱ्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जि. प. सदस्य उमेश ठाकरे होते. प्रमुख उपस्थितीत सरपंच वसंता पवार, पोलीस पाटील निलेश पाटील, ह . भ. प. लोमेश पाटील, काटकर, मुख्याध्यापक नितीन काळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामहरी लावरे, उपाध्यक्षा चंचल उपाध्ये, तलाठी शितल ससाणे, मंगेश लावरे, रमेश राठोड, वसंत उपाध्ये, सुनील वायले, देवेंद्र उपाध्ये, जेमसिंग जाधव, संजू रोकडे, हरीश रोकडे, जय देवरे, लक्ष्मण पारधी, शामराव शंकरपुरे, सौरव येवले, छगन डगवाल, विनोद उगले, गोपाल राठोड, सुखदेव लावरे, रवी पवार आदी सह गावकरी मंडळी व शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आपल्या मार्गदर्शनात उपजिल्हाधिकारी देवरे यांनी सांगितले की, जलतारा ही योजना मनरेगाअंतर्गत राबविली जात आहे. पावसाचे पाणी म्हणजे एकप्रकारे पैसे आहेत. त्यांना पावसाळ्यात जमिनीच्या पोटात जमा करून पाणी बॅलन्स ठेवा आणि सर्व शेतकऱ्यांनी डॉ. पुरुषोत्तम वायाळ यांच्या गावाप्रमाणे आपलेही गाव सुखी आणि समृद्ध करून गाव शेतीनुसार खड्डे करण्याचे नियोजन करण्याचे आवाहन केले.
तसेच जलतारा मोहिमेबद्दल व्यापक माहिती व महत्व शेतकऱ्यांना समजावून सांगितले. अध्यक्षीय मार्गदर्शनात उमेश ठाकरे म्हणाले की, आपल्या गावाला भविष्यात कोणीही कोरडवाहू गाव म्हणून म्हणू नये, यासाठी गावकरी व शेतकरी यांच्या वतीने १३०० जलताराचे खड्डे तयार करून शेती पाणीदार व गाव सधन करण्याचा आश्वासन दिले . व आता आमचा एकच नारा, प्रति एकर एक जलतारा असा नारा दिला. संचालन नितीन काळे यांनी केले, तर उपस्थित मान्यवरांचे आभार लोमेश पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी मंडळातील सर्व तलाठी, कोतवाल व ग्राम पंचायतचे कर्मचारी आदींनी अथक परिश्रम घेतले.