Godavari River: परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठावर पाण्याचा प्रश्न गंभीर
सबलाईन: गोदावरी नदी कोरडी ठक;बागायत क्षेत्रात पिके करपू लागली

परभणी/सोनपेठ : तालुक्यातील गोदावरी नदी कोरडी ठक पडली असल्यामुळे शेती बरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे गोदाकाठ भागात नागरीकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याकडे संबंधिताने लक्ष देण्याची मागणी गोदाकाठ ग्रामस्थांकडून होत आहे. सोनपेठ तालुक्यातील विटा ते लोहीग्राम पर्यंत गोदावरी नदी पात्रात पाणी नसल्यामुळे कोरडे ठक पडली आहे.
यामुळे शेतात पिके पाण्याअभावी वाळू जात आहे. शिवाय जनावरांच्या पिण्याच्या पाण्याबरोबर चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे तालुक्यातील
लासीना, विटा, गंगापिंपरी, थडीउक्कडगाव ,वाडीपिंपळगाव, थंडीपिंपळगाव,गोळेगाव , लोहीग्राम लोहीग्राम तांडा यांसह अन्य गावांतील शेतकऱ्यांना गोदावरी नदी पात्रात पाणी उपलब्ध नसल्याने धरण उशाला कोरड घशाला या म्हणी प्रमाणे अवस्था झाली आहे.
सोनपेठ तालुक्यातील गोदावरी नदी पात्रात पाणी भरपूर असल्याने या भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ऊसाची लागवड केली आहे. यामध्ये जवळपास ५०० ते ५५० हेक्टर क्षेत्रावर नविन व खोडवा ऊस आहे. तसेच केळीचे १५ ते २० हेक्टर क्षेत्र आहे. त्याचबरोबर भाजीपाला, टरबूज खरबूज संत्री मोसंबी डाळिंब आंबा यांसह १५० ते २०० हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड केली आहे. मात्र गोदावरी नदीच्या पात्रात पाणी नसल्याने बोअर व विहिरी यांची पाणीपातळी खालावली असल्यामुळे ही पिके पाण्याअभावी वाळून जात आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी व सिंचनासाठी जायकवाडी धरणात पाणी आवर्त सोडण्यात येत आहे. मात्र या भागातील चाऱ्या नादुरुस्त असल्याने शेतकऱ्यांच्या शेवटच्या टेल अद्याप पाणी पोहोचले नाही. त्यामुळे जायकवाडी धरणाच्या पाण्यापासून शेतकरी वंचित राहावे लागत आहे. गोदाकाठ भागात नागरीकांना व जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. याकडे संबंधिताने लक्ष देऊन पाणी उपलब्ध करून द्यावे, आशी मागणी गोदाकाठ ग्रामस्थांकडून होत आहे.