गुणवंत विद्यार्थ्यांना विमानवारीचे गिफ्ट

गुणवंत विद्यार्थ्यांना विमानवारीचे गिफ्ट
मुख्य कार्यकारी अधिकारींचा पुढाकार
अमरावती जिल्ह्यातील 28 विद्यार्थ्याना घडणार दिल्लीवारी
अमरावती :
जिल्हा परिषद शाळा अंतर्गत गुणवंत विद्यार्थ्याची मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी दखल घेत विद्यार्थ्याना मराठी नववर्षाच्या पूर्वपर्वावर दिल्लीची विमानवारी घडविणारं आहे. दिनांक २५ ते २७ मार्च दरम्यान जिल्ह्यातील २८ विद्यार्थी वातानुकूलित झुकझुक गाडीचा प्रवास करत दिल्ली गाठणार आहे. दिल्ली पर्यटन करून थेट विमानाने नागपूरमार्गे अमरावती परतणार आहे.
शिष्यवृत्ती परीक्षा, एन.एन.एम.एस परीक्षा, माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत विविध गुणवंत विद्यार्थ्यांची या सहलीसाठी निवड करण्यात आली. चौदा पंचायत समितीमधील प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांची या सहली साठी निवड कण्यात आली. सहली दरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी चार शिक्षक – शिक्षिका सोबत राहणार आहे. या सहलीत दिल्लीतील विविध प्रेक्षणीय, राष्ट्रीय स्मारके, ऐतिहासिक व प्रशासकीय वास्तूंना भेटी देणार आहे. राष्ट्रपती भवन, लाल किल्ला, लोटस मंदिर, संसद भवन, राजघाट, कुतुबमिनार, इंदिरा गांधी मेमोरियल, इंडिया गेट,अक्षरधाम मंदिर अश्या प्रसिद्ध स्थळांसह दिल्लीतील काही शाळांना हे विद्यार्थी भेट देणार आहे. जिल्ह्यातील एवढ्या मोठ्या विद्यार्थी संख्येने दिल्लीवारी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या करीता शिक्षणाधिकारी अरविंद मोहरे, उपशिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनाने, विस्तार अधिकारी अशपाक अहमद आदींनी परिश्रम घेतले.
तीन दिवसीय सहल :-
25 मार्च रोजी सकाळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र या सहलीला हिरवी झेंडी देणार आहे. सकाळी वातानुकूलित रेल्वे प्रवास करून सर्व विद्यार्थी दिल्ली येथे जाणार आहे. तीन दिवस व दोन रात्र सहलवजा पर्यटन करून दिल्लीचा ऐतिहासिक व विविध अंगांनी अभ्यास करून परत दिल्ली ते नागपूर विमान प्रवास करणार आहे. पुन्हा नागपूर ते अमरावती वातानुकूलित रेल्वे प्रवास करून अमरावती येथे पोहोचणार आहे.
विद्यार्थी अनुभवणार व्हिआयपी ट्रीटमेंट :-
ग्रामीण भागात वास्तव्य करणाऱ्या विविध जाती धर्मातील गोर गरीब कुटुंबातील विद्यार्थी प्रथमच आपल्या पालकांशिवाय रेल्वे मध्ये वातानुकूलित प्रवास करणार आहे. विशेष म्हणजे चांगल्या दर्जाच्या ठिकाणी त्यांची निवास व्यवस्था राहणार असून दिल्लीतील शाळांना भेटी देऊन शिक्षक व विद्यार्थी तेथील अभ्यासक्रम व उपक्रमांचा अभ्यास करणार आहे.विशेष म्हणजे प्रज्ञावंत विद्यार्थ्यांसोबत प्रज्ञावंत व उपक्रमशील शिक्षकांचा या उपक्रमात सहभाग राहणार आहे.
गुणवत्तेची भेट : संजिता महापात्र
माझ्या जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धात्मक परीक्षेमध्ये यश संपादन केले. त्या यशाची पावती म्हणून दिल्लीची विमानवारी ही ग्रामीण भागातील प्रज्ञावंत विद्यार्थ्याना जिल्हा परिषदेची अनोखी भेट असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी सांगितले.