७ लाख हेक्टरमध्ये खरीप; ८९ हजार क्विंटल बियाण्याची मागणी
कपाशी, तूर, सोयाबीनकडे यंदाही शेतकऱ्यांचा कल; कृषी विभागाचे नियोजन, कृषी आयुक्तालयास प्रस्ताव

अमरावती : यंदाच्या खरीप हंगामाला १०० दिवसांचा अवधी असला, तरी पीक, क्षेत्र, खते व बियाण्यांसाठी कृषी विभागाचे नियोजन सुरू झाले आहे. यावेळी सरासरी ६.८५ लाख हेक्टरमध्ये खरिपाचे क्षेत्र राहण्याची शक्यता आहे व त्यासाठी किमान ८९ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आलेली आहे. यामध्ये सर्वाधिक ७० हजार क्विंटल बियाणे सोयाबीनचे आहे. तसा प्रस्ताव कृषी आयुक्तालयाकडे देण्यात आल्याची कृषी विभागाची माहिती आहे.
आता कुठे रब्बीचा गहू कापणीला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर आवश्यक मशागत केली जाते. मात्र, वेळेवर गोंधळ होऊ नये यासाठी कृषी विभागाद्वारा आतापासून नियोजन केले जात आहे. त्यानंतर मे महिन्यात पालकमंत्र्यांद्वारा जिल्ह्याचा व त्यानंतर कृषी मंत्री विभागाचा खरीप पेरणीपूर्ण आढावा घेतील. त्यानंतर याला मूर्त स्वरूप येणार आहे. गत तीन वर्षांच्या पेरणी क्षेत्राच्या सरासरीनुसार यंदाच्या हंगामात ६.८५ लाख हेक्टरमध्ये पेरणीक्षेत्र राहण्याची शक्यता आहे.
१.४३ लाख मेट्रिक टन खतांची गरज
यंदा १,४३,६६९ मेट्रिक टन रासायनिक खतांचे नियोजन कृषी विभागाद्वारा करण्यात आले व आयुक्तालयाकडे मागणी नोंदविण्यात आलेली आहे. यामध्ये युरिया ३५४०५ मे. टन. २१,२४४ मे.टन डीएपी, ४५२० मे. टन. एमओपी, ४४,६०० मे. टन एनपीके व ३७,९०० मे. टन एसएसएपी या खतांचा समावेश आहे.
नियोजनानुसार शेतकऱ्यांचा कल यंदाही परंपरागत कपाशी, तूर व सोयाबीनकडेच असून मूग, उडदाचे क्षेत्र यंदाही कमीच राहण्याची शक्यता आहे.
पिकांचे सरासरी क्षेत्र (हेक्टर)यंदा ज्वारीचे १०५० क्विंटल, तूर ४२४० क्विं. मूग ७७ क्विं, उडीद ११५ क्विं. भुईमूग २५२ क्विं. कपाशी ६००० क्विं. धान व इतर पिकांना १३२० क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे.