ताज्या घडामोडीमहत्वाचेमहाराष्ट्र

क्षयरोगमुक्त जिल्हा करण्यासाठी लोकाभिमुख चळवळ राबवावी -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

अमरावती : संपूर्ण जिल्हा लवकरच क्षयरोगमुक्त करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनासोबत नागरिकांनीही पुढाकार घ्यावा. जनजागृतीसाठी समाजमाध्यमांचा सुयोग्य वापर करावा. ‘टीबीमुक्त ग्रामपंचायत’ ही लोकाभिमुख मोहीम चळवळ म्हणून राबवावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आज पालकमंत्री श्री. बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली टीबीमुक्त ग्रामपंचायत उपक्रमांतर्गत ‘रौप्य महोत्सव गौरव सोहळा -2024’चे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

आमदार सर्वश्री प्रताप अडसड, केवलराम काळे, प्रवीण तायडे, राजेश वानखडे, प्रवीण पोटे – पाटील, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रमेश बनसोड आदी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च 2023 रोजी वाराणसी येथे ‘क्षयरोगमुक्त भारत’ करण्याची घोषणा केली. त्याअनुषंगाने सर्व देश टीबीमुक्त होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्हा टीबीमुक्त होण्यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तम प्रयत्न करीत आहेत. टीबीमुक्त ग्रामपंचायतींचा रौप्य महोत्सव गौरव सोहळ्यात संबंधित ग्रामपंचायतींना सन्मानित करण्यात आले आहे. अन्य ग्रामपंचायतींनेही त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन टीबीमुक्त ग्रामपंचायत व्हावी, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे. टीबीमुक्त झालेल्या रुग्णांच्या मुलाखती समाज माध्यमांवर प्रसारित कराव्यात. जेणेकरून अन्य रुग्णांनाही यातून आशेचा किरण मिळेल. यातून ते योग्य औषध उपचार करण्यासाठी प्राधान्य देतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी वासनी खु. सरपंच – अवंतिका वाटाणे, हयापूर -अवधूत हिगांटे, खिरगव्हाण – सुजाता सरदार, आंचलवाडी- वैशाली काळमेघ, हरताळा – नूतन काळे, सायत – अन्नपूर्णा मानकर, सावंगी संगम – पंकज शिंदे, कोरडा – सोनाजी सावळकर, कळमगव्हाण नलिनी वानखडे, रामगाव -छाया घरडे, टोंगलाबाद – वैशाली पांझाडे, अडगाव बु. – मंगला खडसे, बोर्डा – अतुल राऊत, डेहणी – शीतल राठोड, दिवानखेड -बाळासाहेब उईके, बेसखेडा- दुर्गा यावले, इसापुर – मनोज धोटे यांना प्रातिनिधिक स्वरूपात सन्मानित करण्यात आले.

डॉ. सुरेश असोले यांनी प्रास्ताविक केले. श्रीकृष्ण पखाले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रमेश बनसोड यांनी आभार मानले.

 

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.