अंजनगाव सुर्जीला पान पिंपरीमुळे विड्याच्या पानांचे गाव म्हणून ओळख; ८५० शेतकरी घेतात उत्पादन, प्रामुख्याने बारी समाजातील शेतकऱ्यांचा व्यवसाय

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : सर्दी, खोकल्याच्या आजारावरील औषधांमध्ये उपयोगात येणारी पान पिंपरी (लेंडी पिंपरी) अन् विड्याच्या पानांचे गाव अशी अंजनगाव सुर्जीची विशेष ओळख आहे. जिल्ह्यात अंजनगाव सुर्जीत असलेल्या पांढरी, खोडगाव, आडगाव या तीनच ठिकाणी ९० टक्के पान पिंपरीसह ४० टक्के विड्याच्या पानाचे उत्पादन घेतले जाते. येथील ८५० शेतकरी उत्पादक आहेत. पान पिंपरी आणि विड्याचे पान ही दोन्हीही नाजूक पिके असून यासाठी मोठ्या प्रमाणात परिश्रम घ्यावे लागतात. प्रामुख्याने बारी समाज दोन्हीचे उत्पादन घेत आहे. हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय असून कधी तो मालामाल बनवतो तर कधी कफल्लक, तरीही त्यांनी पान पिंपरी, विड्याच्या पानाचे उत्पादन घेणे सोडले नाही.
जानेवारी महिन्यात वाफे तयार करून पान पिंपरी, विड्याच्या पानांची पेरणी केली जाते. त्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये पीक हातात येते. एकरी २.५ ते ३ लाखांचे उत्पादन होते. पान पिंपरी ५०० रु. किलो दराने विकली जाते. मात्र, सप्टेंबर महिन्यात ज्यावेळी पान पिंपरीला फुले येतात
त्यावेळी विषाणूची झाडांना लागण झाली तर संपूर्ण झाडच सुकते व परिश्रम, पैसा वाया जातो. त्यामुळे उत्पादक शेतकरी विषाणूंना घाबरतात, अशी माहिती नागार्जुन पान पिंपरी तज्ज्ञ सुभाष थोरात यांनी दिली.
केंद्र सरकारने जिल्ह्यातील वैशिष्ट्य म्हणून पान पिंपरीला जीआय
टॅगही दिला आहे. याचा फायदा लगेच होत नसला तरी येत्या काही दिवसांत शुद्धता, बाजार मूल्यानुसार निश्चितच फायदा उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे पान पिंपरी व विड्याच्या पानांचे गाव अशी अंजनगाव सुर्जीची ओळख कायम राहील, यात दुमत नाही.
अंजनगावात १५ वर्षांपासून पान पिंपरीसह विड्याच्या पानांचे उत्पादन घेतले जात आहे. आधी येथे ८० ते ९० टक्के विड्याच्या पानांचे उत्पादन घेतले जायचे. परंतु, आता ते ४० टक्क्यांवर आले तर पान पिंपरीचे उत्पादन ८० ते ९० टक्क्यांवर पोहोचले आहे. दोन्ही नगदी पिके असली तरी नाजूक विड्याच्या पानांची जपणूक करणे जिकिरीचे तर पान पिंपरीची जपणूक करणे सोपे असून, मागणीही चांगली असल्याने पान पिंपरीच्या उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.