अमरावती उपविभागीय कार्यालयाचे संकेतस्थळ सुरू

अमरावती,: मुख्यमंत्री यांच्या 100 दिवसांच्या कृती आराखडा उपक्रमांतर्गत सुलभ, लोकाभिमुख व गतिमान प्रशासनाचा एक भाग म्हणून सर्वसामान्य जनतेशी संवाद साधण्याच्या उद्देशाने उपविभागीय अधिकारी, अमरावती यांनी त्यांच्या कार्यालयाचे www.sdoamravati.com हे संकेतस्थळ तयार केले आहे. या संकेतस्थळाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे करण्यात आले.
जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती संजिता महापात्र, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे आदी यावेळी उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांनी संकेतस्थळाची आवश्यकता आणि त्याची वैशिष्ट्ये विशद केली. संकेतस्थळामध्ये अमरावती उपविभागाचा इतिहास, अमरावती विभागातील सर्व गावांचे नकाशे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे सामान्य शेतकऱ्याला त्याच्या शेताच्या नकाशासाठी कोठेही फिरण्याची आवश्यकता नाही. तो संकेतस्थळावरून नकाशा डाउनलोड करून आपले काम करू शकतो.
या संकेतस्थळामध्ये प्रशासकीय सेटअपमध्ये अधिकारी ते कर्मचारी अशी सर्वांची नावे आणि त्यांच्याकडे नेमून दिलेली कामे यांची माहिती उपलब्ध असल्यामुळे सामान्य नागरिकांना त्यांच्या कामासाठी नेमके कोणाकडे जावे याची अडचण येणार नाही. संकेतस्थळावर रोजगार हमी योजना, अन्न व नागरी पुरवठा विभाग, संजय गांधी निराधार योजना, माहितीचा अधिकार कायदा, लोकसेवा हक्क कायदा यांसारख्या योजना आणि कायद्यांविषयी माहिती, संबंधित शासन निर्णय आणि योजनांचा लाभ घेण्यासाठीच्या अटी व अर्ज उपलब्ध आहेत. त्यामुळे नागरिकांना आवश्यक असणारे अर्जाचे नमुने संकेतस्थळावरून डाउनलोड करता येतील आणि त्यांना अर्जासाठी कोठेही जाण्याची आवश्यकता भासणार नाही. संकेतस्थळाच्या मीडिया गॅलरीमध्ये कार्यालयामार्फत आयोजित विविध शिबिरे आणि कार्यक्रमांचे फोटो अपलोड करण्यात आले आहेत. तसेच, संकेतस्थळावर कार्यालयाचा हेल्पलाईन क्रमांक आणि ई-मेलही दिलेला आहे.
या संकेतस्थळावर प्रवेश करण्यासाठी QR कोडची निर्मिती करण्यात आल्यामुळे नागरिक सहजपणे संकेतस्थळावर पोहोचू शकतात. हा QR कोड सर्वत्र प्रसिद्ध करण्यात आला आहे.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. राज्यात उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे हे दुसरे संकेतस्थळ आहे. ही योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले.