आरोग्य विभागाच्या प्रयत्नांमुळे मेळघाटातील 65 डम्बा दिलेल्या नवजात बालकाला नवजीवन

अमरावती: मेळघाट भागातील सिमोरी येथील 22 दिवसांच्या एका नवजात बालकाला आरोग्य विभागाच्या अथक प्रयत्नांमुळे जीवनदान मिळाले आहे. या बालकाच्या आईने त्याच्या पोटावर तब्बल 65 डम्बा (विळयाचे चटके) दिले होते. फुलवंती राजू धिकार बालकाच्या आईचे नाव असून, सिमोरी, तालुका चिखलदरा, जिल्हा अमरावती येथील रहिवासी आहे.
घडलेल्या घटनेनुसार,22 फेब्रुवारी 2025 रोजी आई फुलवतीने तिच्या बाळाच्या पोटावर गरम विळयाच्या 65 चटके दिले होते. 24 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 11.30 वाजता अत्यंत गंभीर अवस्थेत जिल्हा स्त्री रुग्णालय, अमरावती येथील एसएनसीयू (नवजात शिशु अतिदक्षता विभाग) मध्ये दाखल करण्यात आले. जिल्हा स्त्री रुग्णालयात केलेल्या तपासणीमध्ये बाळाला जन्मजात हृदयविकार असल्याचे निदान झाले. यामुळे बाळाची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली होती. डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारांसाठी नागपूर येथे संदर्भीत करणे आवश्यक असल्याचे सांगितले होते.
परंतु, बाळाचे आई-वडील त्याला नागपूरला पाठवण्यास तयार नव्हते. या कठीण परिस्थितीत, जिल्हा प्रशासनाने यात तातडीने हस्तक्षेप केला. मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण पारिसे, मेळघाट विभागातील आरोग्य अधिकारी डॉ. तिलोत्तमा वानखडे, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण साळुंके, एसएनसीयू इन्चार्ज डॉ. प्रीती इंगळे, डॉ. अमोल फाले आणि मेळघाटमधील समुपदेशक अलका झामरकर, प्रकाश खडके तसेच सिमोरी गावातील आशा कार्यकर्ती या सर्वांनी एकत्रितपणे जिल्हा स्त्री रुग्णालयात फुलवती आणि तिच्या नातेवाईकांची भेट घेतली. त्यांनी अथक प्रयत्न करून आई-वडिलांना समजावून बाळाच्या उपचारासाठी नागपूरला नेण्याची गरज सांगितली. या प्रयत्नांना यश आले आणि रुग्णाचे नातेवाईक नागपूरला जाण्यासाठी तयार झाले.
त्यानुसार, 27 फेब्रुवारी 2025 रोजी बाळाला पुढील उपचारासाठी नेल्सन हॉस्पिटल, नागपूर येथे दाखल करण्यात आले. तिथे तिच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. सर्व आवश्यक तपासण्या पूर्ण झाल्यावर डॉक्टरांनी बाळावर हृदय शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि 7 मार्च 2025 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.
डॉक्टरांनी केलेले सततचे प्रयत्न आणि उपचार यामुळे 25 मार्च 2025 रोजी आईने बाळाला स्तनपान करण्यास सुरुवात केली. नेल्सन हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या बाळाची प्रकृती स्थिर आहे आणि त्याला उद्या, दि. 29 मार्च 2025 रोजी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
या नवजात बालकाचे प्राण वाचवण्यासाठी डॉ. विनोद पवार, डॉ. प्रीती इंगळे, डॉ. अरुण साळुंके, डॉ. अमोल फाले आणि एसएनसीयू मधील सर्व डॉक्टर्स, सिस्टर्स आणि वॉर्ड बॉय यांनी अत्यंत समर्पित भावनेने कार्य केले. डॉ. विनोद पवार यांच्या विशेष प्रयत्नांमुळे मेळघाटातील या बालकाचे उपचार राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत (RBSK) नेल्सन हॉस्पिटल नागपूर येथे मोफत करण्यात आले. या संपूर्ण चमूने एकत्र येऊन केलेल्या प्रयत्नांमुळे बाळाला नवजीवन मिळाले आहे.