मोबाइल पळविणारे त्रिकूट केले गजाआड

अमरावती : एका बांधकामस्थळावर चौकीदारी करत असलेल्या गृहस्थाचा मोबाइल हिसकावून पळ काढणाऱ्या तीन चोरांना राजापेठ पोलिसांनी अटक केली. ४ मार्च रोजी ही कारवाई करण्यात आली. त्या दोघांसोबत एका अल्पवयीनालाही ताब्यात घेण्यात आले. अभिमन्यू ऊर्फ मोनू सुरेश विश्वकर्मा (२१ वर्षे रा. लक्ष्मीनगर), आर्यन ऊर्फ गौरव सुधीर नागफासे (१९) व सोमेश जुभानी विश्वकर्मा (१९, दोघेही रा. बॉम्बे फैल), अशी अटक आरोपींची नावे आहेत.
संबंधित चौकीदार हे बांधकाम जागेवर चौकीदारी करत असताना अज्ञात चार इसम हे त्यांच्या दिशेने धावून आले. त्यांनी संगनमत त्यांच्या हातातील १४ हजार रुपये किमतीचा मोबाइल हिसकावून पळ काढला.
याप्रकरणी, राजापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास आरंभला होता.
दरम्यान, चार अनोळखी इसम हे शंकरनगर परिसरात फिरत असल्याची माहिती राजापेठ डीबी स्कॉडला मिळाली. त्याआधारे त्या चौघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून दोन दुचाकी, मोबाइल, असा एकूण १.२५ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. त्यांनी राजापेठ ठाण्यात नोंद आणखी एका गुन्ह्याची कबुली दिली. राजापेठचे ठाणेदार पुनीत कुलट यांच्या नेतृत्वात डीबी स्कॉडप्रमुख मिलिंद हिवरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.