जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना ‘बालस्नेही पुरस्कार’ प्रदान

अमरावती, : महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगातर्फे ‘बालस्नेही पुरस्कार 2024’ अंतर्गत उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांना बाल हक्कांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आज मुंबई येथे गौरविण्यात आले.
यशवंतराव चव्हाण सेंटर येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, डॉ. पंकज भोयर, आमदार संजय केळकर, मनिषा कायंदे, प्रशांत नारनवरे, पोलिस अपर महासंचालक अश्वती दोरजे, राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शहा यांच्या उपस्थितीत त्यांना गौरविण्यात आले.
जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात बालकांच्या हक्कांसाठी अनेक प्रभावी योजना राबवण्यात आल्या आहेत. विशेषतः बालविवाह प्रतिबंध, बालकामगार निर्मूलन आणि शिक्षण हक्कांच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने पुरस्कारासाठी निवड केली.
जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी, हा पुरस्कार संपूर्ण टीमच्या एकत्रित प्रयत्नांचे फळ आहे. आम्ही भविष्यातही बालकांच्या कल्याणासाठी कार्यरत राहू, अशी प्रतिक्रिया पुरस्कार स्विकारल्यानंतर दिली. पुरस्काराबद्दल जिल्हा प्रशासन आणि नागरिकांनी जिल्हाधिकारी श्री. कटियार यांचे अभिनंदन केले आहे.