अमरावती ग्रंथोत्सवाला आजपासून सुरुवात *ग्रंथ प्रदर्शन, विक्री व साहित्यिक मेळावा

अमरावती,: अमरावती ग्रंथोत्सव 2024चे उद्घाटन आमदार प्रतापदादा अडसड यांच्या हस्ते विभागीय शासकीय ग्रंथालय येथे आज पार पडले.
पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य सुधीरकुमार महाजन, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी, सहायक ग्रंथालय संचालक डॉ. राजेश पाटील, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष चंद्रकांत चांगदे, राम देशपांडे, नंदकिशोर बजाज, प्रवीण खांडेकर, ग्रंथालय निरीक्षक गजानन कुरवाडे आदी उपस्थित होते.
आमदार श्री. अडसड यांनी, बुद्धीचा विकास करण्यासाठी वाचनाची सवय आवश्यक आहे. नवयुवकांनी विविध विषयांवरील वाचनावर भर द्यावा. माणसामध्ये प्रगल्भता विकसित होणे, तसेच अनुभव, शब्दसंग्रह वाढून अनुभवविश्व समृद्ध करण्यासाठी वाचनाला पर्याय नाही. ग्रंथालयाच्या विकासासाठी प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा करण्यात येणार आहे. मुलांनी आभासी जगतातून पुस्तकांकडे वळणे आवश्यक आहे. नवकल्पना मिळण्यासाठी, नवसंकल्पना रुजविण्यासाठी ग्रंथवाचन आवश्यक आहे. ग्रंथाच्या माध्यमातून व्यवहार कुशलता येत असल्याचे सांगितले.
उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि अमरावती जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यामाने अमरावती ग्रंथोत्सव-2024चे आयोजन संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनाजवळील विभागीय शासकीय ग्रंथालयात करण्यात आले आहे. ग्रंथोत्सव शनिवार, दि. 1 मार्चपर्यंत ग्रंथविक्री सुरू राहणार आहे.
ॲड. प्रिती रेवणे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. राजेश पाटील यांनी आभार मानले.