Latur Zilla Parishad: देशिकेंद्र विद्यालयाचे अवघे ‘मुसळ’ केरात!

लातूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात मोठा घोटाळा!
महादेव कुंभार
लातूर : एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक झालेल्या लातूर येथील देशिकेंद्र विद्यालयाच्या अनागोंदीत ‘संधी’ साधत लातूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील शुक्राचार्यांनी देशिकेंद्र विद्यालयाचे अवघे ‘मुसळ’ केरात तर घातलेच घातले; शिवाय लातूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात या माध्यमातून मोठा घोटाळा केला आहे. संस्थाचालकांच्या परस्पर ‘पावणे पाच’ करण्याचा हा ‘फण्डा’ देशिकेंद्रच्या निवृत्त मुख्याध्यापिकेने आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने मिळून केला. लातूर जिल्हा परिषदेत नव्याने रुजू झालेले तरुण आणि तडफदार मुख्य कार्यकारी अधिकारी याप्रकरणी काय कारवाई करतात? याकडे आता लक्ष लागले आहे.
लातूरच्या देशिकेंद्र विद्यालयांमध्ये नोकर भरती करताना संस्थेच्या अध्यक्ष व सचिवांशिवाय थेट मुख्याध्यापिकेने नोकर भरती केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लातूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण अधिकारी व त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी संगनमत करून अशी बेकायदा भरती केली आहे. विशेष म्हणजे ही भरती करताना कोणतेही नियम पाळले गेले नाही. सेवानिवृत्त झाल्यानंतर एखाद्या मुख्याध्यापिकेने अशी नोकर भरती केल्याचा हा अफलातून प्रकार देशिकेंद्र विद्यालयाच्या बाबतीत घडल्याचे प्रकरण सेवानिवृत्त सहाय्यक प्रकल्प अधिकारी विठ्ठल महापुराव भोसले यांनी उघडकीस आणले आहे. इतकेच नव्हे, तर याप्रकरणी त्यांनी शिक्षण उपसंचालकांसह सर्व संबंधितांना पत्र देत बोगस वैयक्तिक मान्यता रद्द करावी, अशी मागणी केली आहे.
देशिकेंद्र विद्यालयात 1 ऑक्टोबर 2016 पासून अवघ्या 1700 रुपये मानधनावर स्नेहलकुमार नामदेवराव खुडे हे शिपाईपदी काम करतात, त्यांना 1 ऑक्टोबर 2019 पासून वेतनश्रेणीमध्ये सेवकपदी सेवासातत्य देण्यास माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकाकडून आलेल्या पत्रानुसार 1 जुलै 2022 रोजी मान्यता दिली. विशेष म्हणजे शालार्थ प्रणालीमध्ये या कर्मचाऱ्याचा आयडीही काढण्यात आला. सेवक पदाच्या या नियुक्तीस मान्यता देण्याची मागणी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे मुख्याध्यापिका एस के कल्याणी यांनी 19 मे 2022 च्या पत्रानुसार केली.
मात्र अधिक तपशील पाहिला असता मुख्याध्यापिका कल्याणी एस. के. या 31 नोव्हेंबर 2020 रोजी सेवानिवृत्त झाल्या आहेत. संस्थेच्या सचिव अथवा अध्यक्ष यांना कर्मचाऱ्यांना मान्यता देण्याचे अधिकार आहेत. शिवाय संबंधित सेवकपदास 30 सप्टेंबर 2016 रोजी मान्यता देण्याच्या वेळी कल्याणी एस. के. या देशिकेंद्र विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी नव्हत्या तर पी.के. करपे मुख्याध्यापकपदी होते. त्यामुळे लातूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने एस.के. कल्याणी यांच्या बेकायदा व बोगस पत्रांचा आधार घेत शासनाची फसवणूक करण्यात कसर ठेवली नसल्याचे स्पष्ट होत आहे.
सर्व संबंधितांवर गुन्हे दाखल करा!
मुख्याध्यापिका देशिकेंद्र विद्यालय लातूर रबरी शिक्का उमटवून कल्याणी एस.के. यांनी स्वतःची स्वाक्षरी करून खुडे स्नेहलकुमार यांच्या सेवकपदाचा वैयक्तिक मान्यतेचा प्रस्ताव मुख्याध्यापक पदावर कार्यरत नसताना दाखल केला. कल्याणी एस. के. स्वतः नियत वयोमानानुसार मुख्याध्यापक पदावरून दि. 31 जुलै 2021 रोजी निवृत्त झाल्या आहेत. बनावट, बोगस, खोटा प्रस्ताव दाखल करून शासन-प्रशासनाची हेतुपुरस्सर फसवणूक करून त्यांनी खूप मोठा अपराध, गुन्हा केलेला आहे. याची गंभीर दखल घेऊन कल्याणी यांच्यासह या (Latur Zilla Parishad) प्रकरणात गुंतलेल्या सर्व संबंधितांवर एफ.आय.आर तात्काळ दाखल करण्यात यावा, अशी मागणी सेवानिवृत्त सहाय्यक प्रकल्प अधिकारी व्ही. एम. भोसले यांनी केली आहे.