Manora : …न्याय द्यावा, अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा..!

Manora :- तालुक्यातील मौजे गव्हा येथे मंजूर असलेल्या एका कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम लोकेशन बदलून ठेकेदाराच्या नातेवाईकांच्या शेताजवळ करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी बंधारा प्रस्तावित आहे. त्या ठिकाणी काम करण्यात यावे, अन्यथा उपोषणाचा मार्ग अवलंबणार असे निवेदन तहसीलदार मार्फत मृद व जलसंधारण अधिकारी वाशीम यांना गव्हा येथील शेतकऱ्यांनी पाठविले आहे..
कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम मानोरा ते आसोला खुर्द कडे जाणाऱ्या पुलाच्या पश्चिमेकडे प्रस्तावित होता
निवेदनात नमूद केले आहे की, मौजे गव्हा गावाच्या मधोमध वाहणाऱ्या नाल्यावर मृद व जलसंधारण विभागामार्फत तीन कोल्हापुरी बंधारा व नदी खोलीकरण व रुंदीकरण कोटी रुपयाचे काम शासनाने मंजूर केले आहे. एका बंधाऱ्याचे काम कंत्राटदाराच्या मनमर्जीने लोकेशन बदलून करण्यात येत आहे. वास्तविकता ह्या कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम मानोरा ते आसोला खुर्द कडे जाणाऱ्या पुलाच्या पश्चिमेकडे प्रस्तावित होता. परंतु प्रस्तावित कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम लोकेशन नुसार न करता ठेकेदाराच्या नातेवाईकांच्या शेताजवळ करण्यात येत आहे. सदरील बंधाऱ्याचे काम रद्द करून बंधारा प्रस्तावित आहे त्याठिकाणी करण्यात यावे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर शेतकरी रविंद्र डुकरे, हरीभाऊ भोयर, गोपाल देशमुख, गोविंद देशमुख, अतिश देशमुख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.