दीड हजार जमा झाले; पण लाडक्या बहिणींची संख्या २२ हजारांनी घटली !
जिल्ह्यातील ६ लाख ९८ हजार ५३६ महिलांना मिळाला लाभ

अमरावती : शासनाने नुकतात राज्यासह जिल्ह्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा हप्ता जमा केलेला आहे. महिला दिनानिमित्त होळीच्या पूर्वी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर प्रत्येकी दीड हजार रुपये अनुदान जमा झाले. मात्र, यातून अडीच लाखांवर उत्पन्न असलेल्या भागिनींना वगळले. जिल्ह्यातील २२ हजार ६७ लाडक्या बहिणींचे अर्ज रिजेक्ट झाल्याने त्यांना अनुदानाला मुकावे लागले.
होळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने लाडक्या बहिणींच्या खात्यावर १२ मार्चपासून पैसे जमा केले आहेत. राज्य शासनाने या योजनेचे नवीन निकष निश्चित केले. ज्या महिलांच्या नावे चारचाकी आहे, कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक आहे, महिला सरकारी वा निमसरकारी नोकरीत आहेत, अशा सर्वांना व अन्य कारणामुळे यातून वगळले गेले. जिल्ह्यातही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्यापैकी आतापर्यंत २२ हजार महिलांचे अर्ज रिजेक्ट केले आहेत. आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलेचे बँक खाते आधार संलग्न करण्यात आले. आधार संलग्न खाते नसल्यास महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही. अर्थसंकल्प अधिवेशनापूर्वी फेब्रुवारी आणि मार्च या महिन्याचे पैसे एकदाच जमा होतील असे सांगण्यात आले होते; पण प्रत्यक्षात जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने एक महिन्याचाच दीड हजार रुपयांचा हप्ता दिला.