सेवा अधिग्रहीत कर्मचारी बनले १३ वर्षांपासून ‘झेडपी’चे जावई
नियमबाह्य ठाण मांडून : प्रशासन घेणार दखल, उचलबांगडी होईल का?

अमरावती : जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागात सेवा अधिग्रहीत केलेले पाच कर्मचारी तब्बल १३ वर्षांपासून नियमबाह्यरीत्या एकाच ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत. विशेष म्हणजे या प्रतिनियुक्तीला वरिष्ठाची कुठलीही परवानगी न घेताच या कर्मचाऱ्यांची सेवा अधिग्रहीत केलेली आहे. याच कर्मचाऱ्यांच्या माध्यमातूनच पंचायत विभागाचे कामकाज सुरू आहे. या ठिकाणी मूळ आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची नियुक्त न करताच ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या भरोशावर हा विभाग अवलंबून आहे. या गंभीर प्रकाराकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्हा परिषदेमध्ये वर्ग तीन आणि वर्ग चार कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना अथवा रिक्त जागेला पर्याय म्हणून यंत्रणेतीलच इतर कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्त्या, सेवा अधिग्रहीत करून घेतल्या जातात. हा प्रकार कित्येक वर्षांपासून सुरू असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. त्यामुळे अधिग्रहीत केलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा खंडीत होणार का असा प्रश्न आहे.
या ठिकाणी मूळ नियुक्ती जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागात त्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची नियुक्ती ही अंजनगाव सुर्जी, अचलपूर, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर आणि अमरावती या तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीवर केलेली आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष कर्मचाऱ्यांच्या शासनाच्या नियमानुसार वेतन कमी अन् घरभाडे भत्त्याचा लाभमिळत नाही. सेवाअधिग्रहीत केलेले कर्मचारी पंचायत विभागाचा प्रशासकीय डोलारा सांभाळत आहे. त्यामुळे या सेवा अधिग्रहीत केलेल्या कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्त प्रशासन रद्द करून येथे मूळ आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची नियुक्त करण्याकडे कुठल्या आधारे कानाडोळा करीत आहे. हे मात्र समजू शकले नाही.
मान्यता नसताना सेवा अधिग्रहीत कशी ? जिल्हा परिषदांमध्ये वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना पर्याय म्हणून प्रतिनियुक्त्त्या केल्या जातात. ही बाब योग्य नसल्याने याबाबत शासनाने २७जून २००६ रोजीच्या ग्रामविकास विभागाचे पत्रानुसार झेडपीमध्ये अशा कर्मचाऱ्यांच्या अपवादात्मक परिस्थितीत प्रशासकीय दृष्टीने प्रतिनियुक्ती करावयाच्या असतील तर त्या सीईओंनी विभागीय आयुक्तांच्या पूर्व परवानगीनेच कराव्यात अशा सूचना शासनाच्या आहेत. असे असताना अशा प्रकारची कुठलीही परवानगी न घेताच या सेवाअधिग्रहीत केल्या आहेत.
मूळ आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना बगल जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागात वेगवेगळ्या तालुक्यात ग्रामपंचायत अधिकारी म्हणून नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांची जिल्हा परिषद प्रशासनाने नियमानुसार विभागीय आयुक्तांची कुठलीही रितसर परवानगी न घेता सेवा अधिग्रहीत केली आहे. सदर कर्मचारी ८ ते १३ वर्षांपासून मूळ आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची जबाबदारी असलेल्या या कामाचा जबाबदारी पार पाडत आहेत.