मल्चिंगवर मिरची लावा, अनुदान मिळवा, उन्हाळ्यात पैसा कमवा
कमी खर्चात जास्त उत्पन्न: पिकाची वाढही होते जोमदार, असा होतो लाभ

अमरावती : उन्हाळ्यामध्ये पिकांची मोठी काळजी घ्यावी लागते. परंतु, मल्चिंग पद्धतीचा वापर केल्यास पिकांच्या वाढीला गती मिळते व याद्वारे उत्पादन खर्चात बचत करता येते. या पद्धतीने मिरचीची लागवड केल्यास फायदेशीर राहत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
पूर्वहंगामी मिरची पिकाच्या लागवडीसाठी मल्चिंग पद्धतीचा वापर करतात. किंबहुना अनेक भाजीपाला पिकांची लागवड या पद्धतीने करतात. काळानुसार शेती पद्धतीमध्ये आता बदल झालेला आहे. शेतकरी आता आधुनिक पद्धतीचा वापर शेती पिकासाठी करू लागले आहेत. यामुळे कमी खर्चात या तंत्राचा वापर करून जास्त उत्पन्न घेता येत असल्याने अलीकडे मल्चिंगचा वापर जास्त वाढला आहे. या तंत्राने पिकात तण राहत नाही. त्यामुळे पिकाची वाढ जोमदार होते व कमी पाण्यामध्ये मिरचीचे जास्त उत्पादन घेता येते व बाष्पीभवनामुळे होणारा हासदेखील टाळता येतो, असे शेतकऱ्यांनी सांगितले. काळानुसार शेती पद्धतीमध्ये मोठे बदल झाले आहेत. या तंत्रज्ञानाचा शेतकरी आता वापर करू लागल्याने पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भावही कमी होताना दिसत आहे.
बेड टाकणे, वाफे बनविण्याला वेग सद्यःस्थितीत काही भागात बेड टाकणे आणि वाफे बनविणे आदीची प्रक्रिया सुरू आहे. यानंतर यावर मल्चिंग करण्यात येते व याद्वारे पिकांमध्ये पाणी टिकविता येत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
मल्चिंगने बाष्पीभवन थांबते, गवतही मरते मल्चिंग पेपर गवताच्या वाढीस अनुरोध निर्माण करत असल्याने गवत नष्ट होते व तणकट कमी झाल्याने पिकांचे उत्पादन चांगले मिळते. त्यामुळे अलीकडे शेतीमध्ये मल्चिंगचा वापर वाढला आहे.
उन्हाळ्यात कोणती पिके लावतात?उन्हाळ्यामध्ये शेतकरी मिरची, भेंडी, पालक वांग्यासह इतर भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतात. याशिवाय उन्हाळी ज्वारी, उन्हाळी भुईमूग आदी पिकेदेखील शेतकरी घेतात.
बाष्पीभवनाचा वेग वाढला जिल्ह्याचे तापमान सध्या ४० अंशांवर पोहोचले आहे. अशा परिस्थितीत मल्चिंग पद्धतीचा वापर केल्यास पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. जमिनीतील ओलावा टिकून राहतो व अन्नद्रव्य पिकांपर्यंत लवकर पोहोचतात.
मल्चिंगमुळे पिकात तण राहत नाही व कमी पाण्यातही जमिनीतील आर्द्रता टिकून राहते. त्यामुळे आम्ही मिरचीसाठी आता मल्चिंगचा वापर करतो. त्यामुळे उत्पन्नात वाढ झालेली आहे.
आशिष टेकाडे, शेतकरी
उन्हाळी मिरची मिळवून देते नगदी पैसा मल्चिंगवर कमी पाण्यात उन्हाळी मिरचीचे चांगले उत्पादन शेतकऱ्यांना मिळते व याद्वारे शेतकऱ्यांना नगदी उत्पन्न मिळते. उन्हाळ्यात मिरचीला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळतो.
भाजीपाल्यासाठी ठिबकसह बेडचा शेतकऱ्यांद्वारा वापर मिरचीसाठी मल्चिंग पद्धतीचा वापर उत्तम पर्याय आहे. शिवाय भाजीपाला पिकासाठीही ठिबक व बेडचा वापर प्रभावी ठरला आहे. यामुळे पिकाची वाढ चांगली होते व पर्यायाने उत्पादनदेखील चांगल्या पद्धतीने घेतले जाते.
मल्चिंगसाठी एकरी किती अनुदान?
मल्चिंगसाठी प्रति हेक्टरी साधारणपणे ३५ हजार रुपयांचा खर्च येतो. यामध्ये खर्चाचे ५० टक्के म्हणजेच १७हजारांपर्यंतचे अनुदान शेतकऱ्यांना मिळू शकते. दोन हेक्टर मर्यादेत अनुदान मिळू शकते.
महाडीबीटीवर मल्चिंगसाठी अर्ज करता येतो व याद्वारे शेतकऱ्यांना अनुदान मिळते. ऑनलाइन ड्रॉ पद्धतीने शेतकऱ्याची निवड होत असल्याने पारदर्शकता राहते. कृषी विभागाच्या योजनेमुळे फायदा झाला आहे.
गणेश ठाकरे, शेतकरी