घरकुलाकरिता कमी पडणार नाही पैसे

दर्यापूर : विधिमंडळाच्या येथे सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान अमरावती जिल्ह्यातील सन २०२४-२५ या वर्षात प्रधानमंत्री आवास योजनेतील (टप्पा-२) लाभार्थीना अनुदान तातडीने देण्यात यावे, अशी मागणी आ. गजानन लवटे यांनी बुधवारी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून विधानसभेत केली. या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घरकुलाकरिता कुठल्याही परिस्थितीत पैसे कमी पडणार नाहीत आणि कोणी लाभार्थीची अडवणूक करत असेल, तर त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.
जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (टप्पा २) अंतर्गत सन २०२४-२५ या वर्षात घरकुलाकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज गेले होते. घरकुल मंजूर होताच अनेकांनी प्रत्यक्षात सुरुवातही केली. परंतु, या लाभार्थीना प्रत्यक्षात अनुदान मिळण्याकरिता अडचणी निर्माण होत असल्याचे निदर्शनास आल्याने आ. गजानन लवटे यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून लाभार्थीना तातडीने अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी प्रश्न उपस्थित केला. अचलपूर, अमरावती, अंजनगाव सुर्जी, भातकुली, चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, चिखलदरा, दर्यापूर, धामणगाव रेल्वे, धारणी, मोर्शी, नांदगाव खंडेश्वर, तिवसा, वरूड या तालुक्यांमधील अनेक लाभार्थीना घरकुल योजनेतील अनुदान अद्याप मिळालेले नाही, असे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.