सावकाराकडे सहकार विभागाच्या पथकाची धाड
नांदगाव खंडेश्वर येथील घटना; सावकारी संदर्भातील ११ दस्तऐवज जप्त

अमरावती : नांदगाव खंडेश्वर येथील परवानाधारक सावकाराने दोन वर्षात परवान्याचे नूतनीकरण केलेले नाही. शिवाय सहायक निबंधकांनी बजावलेल्या नोटीसला उत्तरही दिलेले नाही. त्यामुळे सहकार विभागाचे पथकाने शुक्रवारी त्यांच्या घरी धाड मारून झडती घेतली. यामध्ये सावकारी व्यवहारासंबंधी ४४ दस्तऐवज आढळून आले. यापैकी ११ दस्तऐवज पथकाद्वारे जप्त करण्यात आले.
मंगेश मधुकरराव डिभे यांचा गजानन ज्वेलर्स आर्ट या नावाने नांदगाव खंडेश्वर येथे सावकारी परवाना आहे व त्यांनी सन २०२३-२४ व २०२४-२५ यादरम्यान परवान्याचे नूतनीकरण केलेले नाही. त्यामुळे सहायक निबंधक सचिन पतंगे यांनी त्यांना नोटीस बजावली होती. याचे उत्तर एआर यांना प्राप्त झालेले नाही. यापूर्वी जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांनी परवानाधारक सावकारांच्या सावकारी व्यवहाराच्या दस्तऐवजाची तपासणी करण्याचे आदेश ४ मार्चला दिले आहेत. त्यामुळे नांदगावचे एआर सचिन पतंगे यांच्या नेतृत्वात सुधीर मानकर, अशिष भांडे, चेतना कुचे यांच्यासह पंच व पोलिस या पथकाने डिभे यांच्या श्रीसंत जगनाडे नगरातील निवासस्थानी ही धाड टाकली.
यामध्ये गहाणठेव पावतीबूक, गहाणसोड पावतीबूक, दुकानाचे नावाचे धनादेश, बँक पासबूक, सोने-चांदी विक्रीचे पावतीबूक, खतावणी नोंदवही, भांडवल पुंजीखाते नोंदवही पथकाने जप्त केली.
नोटीस बजावून परवाना रद्द करणार महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मधील तरतुदीनुसार परवानाधारक सावकार मंगेश डिभे यांना नोटीस बजावण्यात येणार आहे व त्यानंतर परवाना रद्दची कारवाई करण्यात येणार आहे, शिवाय जप्त नोंदणीची पडताळणी करण्यात येणार असल्याची माहिती एआर सचिन पतंगे व सहकार अधिकारी सुधीर मानकर यांनी ‘खरा संवाद’ला दिली.