ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्रशिक्षण

सर्व वर्गात सीबीएसई शिकविणार का?

नवीन सत्रात होणार नियोजन : दर्जेदार शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य घडणार

अमरावती : आगामी शैक्षणिक सत्रापासून सर्व शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. सुकाणू समितीच्या शिफारशीनंतर इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत सीबीएसई पॅटर्न लागू करण्यात आल्याची घोषणा राज्याचे शालेय शिक्षणमंत्र्यांनी केली. सध्यातरी याबाबत कुठलेही परिपत्रक निघाले नसले तरी या घोषणामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सीबीएसई लागू झाल्यास मराठीचे काय होईल. विद्यार्थ्याचे काय होईल. शाळा बंद पडणार की राहणार, असे एक ना अनेक प्रश्न पालकांसमोर उपस्थित होत आहेत.

मोफत पाठ्यपुस्तके मिळणार का ?

सीबीएसईच्या नवीन पाठ्यक्रमानुसार बालभारतीमार्फत इयत्ता पहिलीच्या पाठपुस्तक निर्मितीचे कामकाज सुरू आहे. २०२५मध्ये पहिलीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मिळणार आहेत. 

 

१ ली सीबीएसई अभ्यासक्रमासाठी इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

सर्व शाळांना अभ्यासक्रम

सीबीएसई अभ्यासक्रम हा सर्व शाळांमध्ये सुरू होणार असला, तरी शासनाकडून परिपत्रक अद्याप काढलेले नाही. सध्या तरी शालेय शिक्षणमंत्र्यांनी केवळ घोषणा केली आहे.

यामुळे फायदे, तोटे काय?

फायदे : राज्यातील जे गोरगरीब पालक पाल्यांना सीबीएसई शाळेत शिकवू शकत नाही त्यांना ‘सीबीएसई’चे गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्याची संधी मिळेल. नीट, जेईईची परीक्षा सीबीएसई अभ्यासक्रमावर आधारित असल्याने त्याचा लाभ होईल व राज्यातील मुलांच्या या प्रवेशपरीक्षेमध्ये टक्का वाढेल. बंद पडणाऱ्या शाळांना दिलासा मिळू शकेल.

तोटे : ‘सीबीएसई’चे माध्यम इंग्रजी असणार हे उघड आहे. त्यामुळे पहिल्यांदा याकरीता सक्षम असा स्टॉप असणे आवश्यक आहे. सीबीएसई आणि स्टेट बोर्डाचा एकसारखा अभ्यासक्रम असावा, याची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने व्हावी.

 

राज्यातील सर्व शाळांमध्ये सीबीएसई पॅर्टर्न लागू करण्याचा निर्णय चांगला आहे. मात्र, हे करत असताना सीबीएसई आणि स्टेट बोर्ड यांचा हा पॅर्टन सारखा असावा, याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करावी व शिक्षकांना प्रशिक्षण द्यावे.

अरविंद मंगळे, मार्गदर्शक, विजुक्रा

 

सीबीएसई पॅटर्न सुरू करण्याची घोषणा ही योग्य असली तरी त्यापूर्वी या शिक्षणासाठी आवश्यक रचना तयार करणे आवश्यक आहे. जोपर्यंत हे होणार त्याशिवाय याचा फायदा होणार नाही. त्यामुळे अगोदर मूळ पाया मजबूत करावा. त्यानंतरच टप्प्याटप्प्याने सीबीएसई पॅटर्न लागू करावा, तर याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल.

दिलीप कडू, राज्याध्यक्ष, शिक्षक संघ

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.