राष्ट्राच्या विकासात प्राचार्य, संचालक आणि शिक्षकांची संस्थात्मक सिद्धता अत्यंत महत्त्वाची : डॉ. शैलेंद्र देवळाणकर

प्राचार्य व संचालक कार्यशाळेचे उद्घाटन
राष्ट्राच्या विकासात प्राचार्य, संचालक आणि शिक्षकांची संस्थात्मक सिद्धता अत्यंत महत्त्वाची : डॉ. शैलेंद्र देवळाणकर
संपादक /अग्रदूत 25- जाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे सर्वच आघाड्यांवर नवे पायंडे तयार करणारे विद्यापीठ असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण व लोकशाहीकरण ह्यासंदर्भात चर्चा व आदानप्रदान करणारी संलग्नित महाविद्यालय आणि परिसंस्थांमधील प्राचार्य व संचालकांची निवासी कार्यशाळा आयोजित करणारेही हे राज्यातील एकमेव विद्यापीठ आहे. या उपक्रमाचा राज्यातील सर्वच विद्यापीठांनी आदर्श घ्यायला हवा, असे मत राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी व्यक्त केले.
विद्यापीठाच्या वतीने सिंहगड इन्स्टिट्यूट, कुसगाव येथे आयोजित प्राचार्य व संचालक निवासी कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बीजभाषण करताना ते बोलत होते.
आर्थिक उदारीकरणानंतरही शिक्षणाचे क्षेत्र दुर्लक्षितच होते, परंतु राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने यात हेतूपूर्वक हस्तक्षेप करून शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण व व्यापक लोकशाहीकरण केले. राष्ट्राच्या निर्मितीतील प्राचार्य, संचालक आणि शिक्षकांची संस्थात्मक जबाबदारी आणि व्यक्तिगत पातळीवरची सिद्धता ही खूप महत्त्वाची असल्याचे सांगून, सर्वच आघाड्यांवर राष्ट्राची स्टील फ्रेम बळकट करण्याची जबाबदारीच शिक्षणसंस्था, शिक्षक व प्राचार्यांची असून प्राचार्य हे या परिवर्तनाचा दुवा असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक संयोजन समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे ह्यांनी केले.
ह्या सत्रात प्रारंभी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर ह्यानीही मार्गदर्शन केले. उच्च शिक्षणाच्या बदलत्या पर्यावरणात विद्यापीठाने राबवलेले उपक्रम व योजनांची माहिती देत त्यांनी विद्यापीठ सक्रिय राहण्यात प्राचार्य हा घटक महत्त्वाचा असल्याचे सांगितले.
सूत्रसंचालन अधिष्ठाता प्रा. डॉ. प्रभाकर देसाई ह्यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने दिनांक 24 व 25 जानेवारी 2025 रोजी आयोजित प्राचार्य व संचालक कार्यशाळेत शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयकरण व नवी संधी, प्राचार्यांची बदलती जबाबदारी व भूमिका, ओजेटी-इंटर्नशिप आणि करिअर कट्टा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीतील नवे प्रयोग, विविध अर्थसहाय्य योजना, उच्चशिक्षणातील गुणवत्ता, उच्च शिक्षणातील नियमन बहुविधता अशा सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी होते. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, कुलसचिव प्रा. डॉ. ज्योती भाकरे तसेच श्री. रवींद्र शिंगणापूरकर, प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे हे व्यवस्थापन परिषद सदस्य तसेच प्रा. डॉ. संजय खरात, प्रा. डॉ. वैभव दीक्षित, प्रा. डॉ. नितीन झावरे हे संयोजन समितीचे सदस्य, याशिवाय अधिष्ठाता प्रा. डॉ. विजय खरे, प्रा. डॉ. प्रभाकर देसाई, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य संचालक डॉ. देविदास गोल्हार यांसह नियोजन व विकास विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
या दोन दिवसीय निवासी कार्यशाळेत पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील सुमारे 125 प्राचार्य व संचालकांनी सहभाग घेतला आहे.
पुणे शहरात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह जवळपास 25 हून अधिक विद्यापीठे अस्तित्वात आहेत. या सर्व विद्यापीठांना विरोध न करता राज्य विद्यापीठ म्हणून आम्ही या सर्वच विद्यापीठांसोबत सहयोगात्मक व सामंजस्य घडवून उच्च शिक्षणात बदल घडवून आणू शकतो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची सर्वंकष व परिणामकारक अंमलबजावणी आणि आमूलाग्र बदलात प्राचार्य आणि संचालक यांची सकारात्मक भूमिका अत्यंत महत्त्वाची असून विद्यापीठ नेहमीच महाविद्यालय व परिसंस्थांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील.
*प्रा. डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू*